ST Strike कोल्हापूर : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ‘खासगी’ वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 05:22 PM2018-06-09T17:22:24+5:302018-06-09T17:22:24+5:30
पगारवाढ अमान्य असल्याने एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी वडापला अधिकृत पर्याय दिला आहे. बसस्थानकांबाहेर परिसरात काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था सकाळपासून करण्यात आली. काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होते.
कोल्हापूर : पगारवाढ अमान्य असल्याने एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी वडापला अधिकृत पर्याय दिला आहे. बसस्थानकांबाहेर परिसरात काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था सकाळपासून करण्यात आली. काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होते.
शुक्रवारी सकाळपासून राज्यभर एस. टी. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. कोणतीही घोषणाबाजी नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नाही, असे नियम पाळत कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत; पण यामध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि महामंडळाला प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना कारावा लागत आहे.
एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवारी वडापला अधिकृत पर्याय दिला आहे. बसस्थानकांबाहेर परिसरात काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था सकाळपासून करण्यात येत होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी सकाळी स्वत: आरटीओ अधिकारी यांनी खासगी वाहने बसस्थानकाबाहेर लावून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करून दिली. बंदमुळे संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकाबाहेर शुकशुकाट होता, तर प्रत्येक बसस्थानकाबाहेर कर्मचारी एकत्र येऊन मुंबईतून याबाबत काही सूचना येतात का? याची चर्चा करताना दिसत होते.
एस.टी. बस संपामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व प्रवासी बसेस, कंपन्यांच्या बसेस, स्कूल बसेस, मालवाहतूक करणारी वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. सकाळपासून काळ्या - पिवळ्या टॅक्सी व इतर टॅक्सी माध्यमातून मध्यवर्ती बसस्थानकांतून प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
सुभाष देसाई,
मोटर वाहन निरीक्षक
कामगारांच्या काम बंद आंदोलनात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जे काही मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्या आधारे गाडी सोडण्याचे काम सुरू आहे. दुपारी बारापर्यंत ५५ गाड्या विविध मार्गांवर मागस्थ झाल्या आहेत.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने शिवशाही गाडीमार्फत पुण्यापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची व्यवस्था करण्यात येत होती. त्यामुळे या गाड्यांना दिवसभर प्रवाशांची मोठी होती.
शिवशाही सुरू....
कोल्हापूर विभागामार्फत कोल्हापूर-पुणे या मार्गावरील दर अर्ध्या तासाने शिवशाही बसगाडी सोडण्यात येत आहे. या गाड्या, कऱ्हाड, सातार मार्गे जात असल्याने प्रवशांची मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे.
२ हजार ८६५ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
कोल्हापूर जिल्ह्यात एस. टी. महामंडळाकडे प्रशासकीय, कार्यशाळा, चालक व वाहक असे एकूण चार हजार ८४४ कर्मचारी कार्यरत आहेत. काहीजण साप्ताहिक सुटी, दौरा, अधिकृत रजेवर आहेत. त्यापैकी शनिवारी २ हजार ८६५ कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले. उपलब्ध मनुष्यबळानुसार वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
संभाजीनगर येथे जेवणाची व्यवस्था....
संभाजीनगर आगार येथे परगावीच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसस्थानकांबाहेर आगारातील कर्मचाऱ्यांच्यावतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना सकाळी एकवेळेचे जेवण देऊन सर्वजण काम बंद आंदोलनात सहभागी झाले.
‘शिवशाही’ची काच फोडली
शिरोली फाटा येथे शनिवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तीने कोल्हापूर- पुणेकडे जाणाऱ्या शिवशाही गाडीवर दगड मारून गाडीची काच फोडली. ही घटना प्रशासनास कळताच त्यांनी पर्यायी गाडीची व्यवस्था करून दिली. मात्र, या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता.