ST Strike : ..'तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 06:41 PM2021-11-12T18:41:31+5:302021-11-12T18:43:58+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते.
कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना शशांक राव म्हणाले, विलिनीकरण झाले नाही तर कामगारांचे रोजचे मरण आहे. आधीच एसटी कर्मचाऱ्यांना फार कमी पगार आहेत. त्यात आता पगार येईल की नाही याची शाश्वती नाही. नोकरी टिकण्याची शाश्वती नाही. कोवीड काळात एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा सर्वांनी पाहिली आहे. मात्र सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे गार्भियाने पाहणार नसेल आणि सकारात्मक निर्णय घेणार नसेल तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कोल्हापुरात देखील गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हजारो एसटी कर्मचारी सहभागी आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, संपात सहभागी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे.
दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी शासनाला सुबुद्धी येऊ दे, आंदोलन संपून लालपरी रस्त्यावर धावू दे रे महाराजा... असे म्हणत एसटीलाच गाऱ्हाणे घातले. एसटीला हार घालून आरती केली. दरम्यान, पाचव्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच आहे. .
दरम्यान, एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांकडून जादा दर आकारला जात असून लुट सुरु आहे. अनेक प्रवाशी स्थानकात बसून आहेत. एकूणच बसस्थानकात कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. या आंदोलनामुळे एसटी महामंडळास मोठा तोटा होत आहे.