कर्नाटकातील एसटीची वाहतूक सलग दुसऱ्यादिवशी बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 01:36 PM2021-02-25T13:36:42+5:302021-02-25T13:39:45+5:30
state transport kolhapur news- प्रत्येक प्रवाशाचा कोरोना अहवाल असल्याशिवाय कर्नाटक हद्दीत प्रवेश देणार नाही. अशा आडमुठ्या धोरणामुळे कोल्हापुरातून कर्नाटकात होणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाची बस वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बंद राहिली.
कोल्हापूर : प्रत्येक प्रवाशाचा कोरोना अहवाल असल्याशिवाय कर्नाटक हद्दीत प्रवेश देणार नाही. अशा आडमुठ्या धोरणामुळे कोल्हापुरातून कर्नाटकात होणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाची बस वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बंद राहिली.
वाहतूक सुरू करण्यासंबंधी कर्नाटक शासनाच्या प्रतिनिधींशी महामंडळाचे अधिकारी बुधवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा करत होते. मात्र, त्यांना यात यश आले नाही. कर्नाटकातील प्रमुख शहरांना कोल्हापुरातून ३५ बस धावतात. त्या सर्व गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. या धोरणाचा फटका बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांना जास्त बसत आहे.
कर्नाटकातून येणाऱ्या केएसआरटीसीच्या सर्व बस विनातपासणी कोल्हापूरसह राज्यभरात सर्वत्र फिरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने अद्यापही अटकाव केलेला नाही. परंतु महाराष्ट्राच्या एस.टी. बसना कर्नाटक शासनाने अहवालाशिवाय येण्यास बंदी घातली आहे.
याबाबत बुधवारी सायंकाळी राज्य परिवहन मार्ग महामंडळाचे अधिकारी कर्नाटक शासनाच्या प्रतिनिधींशी वाहतूक सुरू करण्यासंबंधी चर्चा करीत होते. मात्र, कर्नाटक शासनाने रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिलेली नव्हती. कोल्हापुरातून बेळगाव, हुबळी, सौदत्ती, बदामी, दांडेली, बंगळुरू, धारवाड, शिमोगा आदी ठिकाणी प्रवासी वाहतूक होते.
गडहिंग्लज-चंदगडची वाहतूक सुरळीत..
महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील शेवटचे तालुके असणारे चंदगड, आजरा, गडहिंग्लज या गावांना कोल्हापुरातून एस.टी. बस जाण्यासाठी निपाणीतून प्रवेश दिला आहे. या बसना निपाणीत थांबा देण्यात आलेला नाही. कोल्हापुरातून सुटलेल्या एस.टी. बस विना थांबा या तीन ठिकाणी जात आहेत.