एस.टी.ची वाहतूक सुरळीत - संप मागे : कोल्हापूर कर्मचाऱ्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:52 AM2018-06-10T00:52:11+5:302018-06-10T00:52:11+5:30
एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
कोल्हापूर : एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. संप मिटताच रात्री उपलब्ध होतील त्या कर्मचाऱ्यांमार्फत विविध मार्गांवर बसगाड्या सोडण्यात येत होत्या. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शनिवारी काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची गैरसोय टळली.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोणतीही घोषणाबाजी नाही, नुकसान करायचे नाही, असे नियम पाळत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. ‘बंद’मुळे संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांबाहेर शुकशुकाट होता. दोन दिवसांत कोल्हापूर विभागाचे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले. ‘शिवशाही’तर्फे दर अर्ध्या तासाने शिवशाही बसगाडी सोडण्यात येत आहे. या गाड्या, कºहाड, सातारामार्गे जात असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईतील बैठक यशस्वी झाल्याने संप मागे घेण्यात आला.
२ हजार ८६५ कर्मचारी सहभागी
कोल्हापूर जिल्ह्णात एस. टी. महामंडळाकडे प्रशासकीय, कार्यशाळा, चालक व वाहक असे एकूण चार हजार ८४४ कर्मचारी कार्यरत आहेत. काहीजण साप्ताहिक सुटी, दौरा, अधिकृत रजेवर आहेत. त्यापैकी शनिवारी २ हजार ८६५ कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.
दोन ‘शिवशाही’ बसची काच फोडली
शिरोली फाटा येथे शनिवारी मध्यरात्री कोल्हापूर-पुणे या शिवशाही गाडीची तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसवर नेसरीपासून दोन किलोमीटर अंतरावर अर्जुनवाडी फाट्यावर अज्ञात व्यक्तीने गाडी थांबविण्याचा हाताने इशारा करून वेग कमी झालेल्या बसच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
दिवसभरातील दृष्टिक्षेप
२५ शिवशाही बसगाड्या
पुण्याकडे रवाना
१ गाडी मुंबईकडे रवाना
रात्री आठपर्यंत फक्त
२ हजार १८० फेऱ्या
२८ हजार ८१४ फेऱ्या रद्द
७० लाखांचे उत्पन्न बुडाले
२ शिवशाही बसगाड्यांवर दगडफेक
रात्री दहानंतर संप मागे.
संभाजीनगर येथे जेवणाची व्यवस्था
संभाजीनगर आगार येथे परगावच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसस्थानकांबाहेर आगारातील कर्मचाºयांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना सकाळी एकवेळचे जेवण देऊन सर्वजण काम बंद आंदोलनात सहभागी झाले.
मुंबईतील बैठकीत पगारवाढीबाबात सकारात्मक निर्णय झाल्याने आम्ही काम बंद आंदोलन मागे घेत आहे. सर्व कामगारांच्या एकजुटीमुळेच हे शक्य होऊ शकले.
- उत्तम पाटील, विभागीय अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटना
राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रेट्यामुळे प्रशासनास पगारवाढीबाबात योग्य निर्णय घेणे भाग पडले आहे. मनासारखी जरी पगारवाढ झाली नसली, तरी पगारवाढीच्या जवळपास गेलो आहे.
- आप्पासाहेब साळोखे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)