इंगळीत दगडफेक; पोलिसांचा लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2016 01:25 AM2016-12-31T01:25:26+5:302016-12-31T01:25:26+5:30

दोन गटांत राडा : तरुण जखमी, गाव बंद, रास्ता रोको, वादग्रस्त डिजिटल फलक हटवला

Stacked stones; Police lathamar | इंगळीत दगडफेक; पोलिसांचा लाठीमार

इंगळीत दगडफेक; पोलिसांचा लाठीमार

Next

हुपरी : इंगळी (ता. हातकणंगले) येथे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त डिजिटल फलकावरून शुक्रवारी रात्री दोन गटांत राडा झाला. दोन्ही गट समोरासमोर आल्याने घोषणा, प्रतिघोषणा, आव्हान, प्रतिआव्हान देत तुफान दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. दगडफेकीत एक तरुण जखमी होण्याबरोबरच वादग्रस्त फलकाचेही नुकसान झाले आहे.
घटनेनंतर गावात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला असून, जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, तहसीलदार वैशाली राजमाने, आदी वरिष्ठ अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत हा वादग्रस्त फलक काढून टाकण्यात आला.
सन १८१८मध्ये पेशव्यांच्याबरोबर झालेल्या लढाईत मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ सहभागी सैनिकांना मानवंदना देण्यासाठी (पान १ वरून) इंगळी (ता. हातकणंगले) हा डिजिटल फलक लावण्यात आला होता. या फलकावर काही वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. हा वादग्रस्त फलक हटविण्याच्या मागणीवरून गेल्या चार दिवसांपासून गावातील दोन गटात तेढ निर्माण होऊन संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रश्नी तडजोड घडवून गावात सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व हुपरी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, दोन्ही गट आपापल्या मतावर ठाम राहिल्याने गेल्या तीन दिवसांपासून गावातील वातावरण चिघळत राहिले होते. या गंभीर घटनेकडे पोलिस प्रशासनाने ठोस अशी कारवाई करण्याची भूमिका न घेता व गांभीर्याने न पाहता केवळ चालढकल केल्याने परिणामी इंगळी गावातील तणावग्रस्त वातावरण हुपरी शहरापर्यंत येऊन पोहोचले. परिणामी, या वादग्रस्त फलकावरून निर्माण झालेले तणावग्रस्त वातावरण आणखीन स्फोटक होण्यास सुरुवात झाली होती.
पोलिस प्रशासन याप्रश्नी ठोस कृती करीत नसल्याचे पाहून शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास हुपरी व इंगळीतील काही तरुण वादग्रस्त फलक परिसरात जमा होऊ लागले. त्यामुळे फलक लावणारा गटही तेथे आला. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वातावरण आणखीन चिघळले जावून पोलिसांच्या समोरच दोन्ही बाजूने घोषणा -प्रतिघोषणा, आव्हान-प्रतिआव्हान देण्यास सुरुवात झाली. काही वेळाने दगडफेकही सुरू झाली. यामध्ये एक तरुण जखमी होवून वादग्रस्त फलकाचेही नुकसान झाले. परिणामी पोलिसांनी संतप्त जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करून दोन्हीकडील जमावाला पळवून लावले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गावात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला असून, सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. (प्रतिनिधी)
----------------
टायरी पेटवून रास्ता रोको
वादग्रस्त फलकप्रश्नी पोलिस प्रशासन ठोस असा निर्णय न घेता केवळ बैठकावर बैठका घेवून वेळ मारून नेत असल्याचे पाहून दुपारी इंगळीतील संतप्त जमावाने गाव बेमुदत बंदचे आवाहन करून पेटत्या टायरी रस्त्यावर टाकून रास्ता रोको केला होता. तरीही पोलिस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने त्याचे रूपांतर राडा होण्यात झाले.

:चौकट :
वेळीच कारवाई झाली असती तर
गेल्या तीन दिवसांपासून हा वादग्रस्त फलक काढण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला असतानाही पोलिस प्रशासनाने केवळ बैठकावर बैठका घेत वेळ मारून नेण्याचे काम केले. मात्र, दोन्ही गटात राडा होताच रात्री दहा वाजता पोलिसांनी स्वत:हून हा वादग्रस्त फलक काढून टाकला. पोलिसांनी जर अशीच कारवाई वेळीच केली असती तर गावात दंगा न होता दोन्ही समाजात सामंजस्य कायम राहण्यास मदत झाली असती.
------
फोटो 30 इंगळी तणाव एसपी
इंगळी येथे दोन्ही समाजात तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता.


राष्ट्रीय महामार्ग रोखला
कोल्हापूर : इंगळी घटनेचे पडसाद रात्री उशिरा कोल्हापुरात उमटले. रात्री सव्वाअकराच्या दरम्यान सुमारे दीडशे तरुणांच्या गटाने अचानक तावडे हॉटेलजवळच्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर टायरी पेटवून महामार्ग रोखला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूने जवळजवळ २० ते २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे तातडीने घटनास्थळी आले. इंगळी येथे पोलिसप्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी तपास करीत आहेत. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही आंदोलन मागे घ्या, असे आवाहन राणे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. इंगळी येथील घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडविण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. रात्री सव्वाबारानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Stacked stones; Police lathamar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.