निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास गडहिंग्लजमध्ये धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:44 PM2019-04-24T13:44:30+5:302019-04-24T14:08:18+5:30
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी भत्ता मागण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुक्की करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न गडहिंग्लज येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांनी प्रथम भत्ताही देण्यास नकार दिला. वाद घातल्यानंतर रात्री अकरा वाजता तीनशे रुपये देउ केले. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षकांमार्फत मिलिंद यादव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी भत्ता मागण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुक्की करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न गडहिंग्लज येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांनी प्रथम भत्ताही देण्यास नकार दिला. वाद घातल्यानंतर रात्री अकरा वाजता तीनशे रुपये देउ केले. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षकांमार्फत मिलिंद यादव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २२ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता चंदगड मतदारसंघात १00 हून अधिक शिक्षक हजर झाले. राखीव शिक्षकांपैकी ४६ जणांना झोनल अधिकाऱ्यांचे सहकारी म्हणून नेमले गेले आणि दोन दिवस त्यांच्याकडून काम करवून घेण्यात आले. मात्र, उर्वरित राखीव शिक्षकांची प्रशासनाने दखलही घेतली नाही. अनेकांची राहण्याची तसेच भोजनाचीही चांगली व्यवस्था केली नाही. चंदगड विश्रामगृहावर तर प्यायलाही पाणी नव्हते.तरीही या शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम केले.
निवडणुकीचे कामकाज संपल्यानंतर रात्री गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलच्या प्रांगणात कर्मचारी निवडणुक साहित्य जमा करत होते. याचवेळी त्यांना भत्ताही देण्यात येत होता. मात्र, राखीव कर्मचाऱ्यांना भत्ता देण्यात येणार नसल्याचे सुरुवातीलाच सांगण्यात आले. यामुळे संबंधित शिक्षकांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे बोट दाखविताच त्यांनी थेट प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे विचारणा केली. मात्र प्रांताधिकारी पांगारकर यांनी तुसड्या पध्दतीने शिक्षकांशी व्यवहार करुन भत्ता देय नसल्याचे सांगितले. वाद घातला असता रात्री दहा वाजता सर्र्वाना भत्ता देण्यास सुरुवात केली. २२00 रुपये ठरलेले असताना केवळ ३00 रुपयेच भत्ता देउ केल्याने बऱ्याच शिक्षकांनी तो नाकारला.
काम करुनही कामाचा भत्ता देणार नसल्याचे समजताच शिक्षकांचा संताप अनावर झाला. शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, मिलिंद यादव यांनी याचा जाब प्रशासनाला विचारताच पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिलींद यादव यांची गळपट्टी धरून त्यांना धक्काबुक्की केली. मात्र, यावेळी सर्व शिक्षकांनी एकजूट दाखवून पोलिसांच्या या अरेरावीला उत्तर दिले. याला सर्वांनी कडाडून विरोध केला. शेवटी प्रशासनाने रात्री उशिरा शासनाने दिलेल्या नियमानुसार भत्ता देण्यास सुरुवात केली.
या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी बुधवारी मिलिंद यादव, सुधाकर पाटील, राजेंद्र कोरे, संजय पाटील, राजेश बरक, प्रा. राजेंद्र हिरकुडे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेउन केली. या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.