गाळेधारकांचा महापालिकेवर मोर्चा
By admin | Published: January 11, 2017 01:05 AM2017-01-11T01:05:17+5:302017-01-11T01:05:17+5:30
महापौर : गाळेधारकांवर कारवाई नको; आठवड्यात संयुक्त बैठक
कोल्हापूर : अन्यायी भाडेवाढविरोधातील गाळेधारकांवर कारवाई करू नका, अशा सक्त सूचना देत, याप्रश्नी आठ दिवसांत महापालिका प्रशासन व गाळेधारक यांची संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन महापौर हसिना फरास यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्ष महापालिका गाळेधारक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
अन्यायी भाडेवाढीविरोधात गाळेधारक संघटनेतर्फे मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी महापौर फरास यांना संघटनेने निवेदन दिले. या विषयावर महापौरांच्या दालनात माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर व माजी स्थायी सभापती आदिल फरास यांच्याबरोबर चर्चा झाली. व्यवसाय आणि बाजारमूल्य याच्यां समन्वयाने भाडेवाढीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन पाटणकर यांनी यावेळी दिले.
महापालिकेचे सुमारे दोन हजार गाळेधारक आहेत. त्यांना प्रशासनाने रेडीरेकनर (बाजारमूल्यानुसार) पद्धतीने भाडेवाढीच्या नोटिसा पाठविल्या. ही भाडेवाढ सुमारे पाच ते सहा पटींमध्ये आहे. यापूर्वीही गाळेधारकांनी आयुक्त पी. शिवशंकर व महापौर यांना निवेदन दिले आहे; पण निर्णय घेतला नाही. शहरात रेडीरेकनरच्या दरानुसार गाळेधारकांची भाडेवाढ केली. त्यामुळे किमान पाच ते सहा पटींत ही भाडेवाढ झाली. याला विरोध म्हणून टेंबे रोडवरील शेकाप कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे महापालिकेवर आला.
यावेळी संपतबापू पवार, बाबूराव कदम, संघटनेचे अध्यक्ष मधुकर हरेल, माजी प्राचार्य टी. एस. पाटील, संदीप वीर, सुनीलकुमार सरनाईक, संभाजी जगदाळे, बबन महाजन, आदींनी ही अन्यायकारक भाडेवाढ म्हणजे जिझिया परतवून लावला पाहिजे. आयुक्त पी. शिवशंकर यांना याचे काही देणे-घेणे नाही, अशाही संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर संपतबापू पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ महापौर फरास यांना भेटले. त्यावेळी महापौर यांचे प्रतिनिधी आदिल फरास यांनी, राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेडीरेकनर पद्धतीने ही भाडेवाढ आकारणी केल्याचे सांगून चर्चा केली. मोर्चात रवी चौगले,सुरेश जरग, भाऊ घोगले, व्ही. आर. पाटील, वनिता दीक्षित, मेहेजबीन शेख, सुशांत बोरगे, बबेराव जाधव, सुभाष सावंत, आदींचा सहभाग होता.
कायदा बदला; पण भाडेवाढ कमी करा
आमचा भाडेवाढीला विरोध नाही; पण रेडिरेकनर पद्धतीने जी भाडेवाढ केली आहे, ती चुकीची आहे. शासनाचे तसे निर्देश असले तरी ते पाळू. कायदा बदला; पण ही अन्यायकारक भाडेवाढ कमी करा, अशी भावना संपतबापू पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
गाळेधारकांवरील अन्यायी भाडेवाढीविरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्ष महापालिका गाळेधारक संघटनेतर्फे मंगळवारी कोल्हापूर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गाळेधारक सहभागी झाले होते.