Kolhapur News: शिळे अन्नच उठले गायींच्या जिवावर, कणेरी मठावरील गायी दगावल्यामुळे सुरु होती उलटसुलट चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:09 PM2023-02-27T12:09:10+5:302023-02-27T12:10:07+5:30
कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान गायी दगावल्याने लोकोत्सवाला गालबोट
कोल्हापूर : कणेरी मठावरील गायी नेमक्या कशामुळे दगावल्या, त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या, पण शिळे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळेच गायी दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. मठातील कर्मचारी आणि व्यवस्थापकांचे अज्ञान निष्पाप गायींच्या जिवावर बेतले. या घटनेत घातपाताचा प्रकार नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान गायी दगावल्याने लोकोत्सवाला गालबोट लागले. या घटनेनंतर मठातील जबाबदार व्यक्तींनी सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे संभ्रम आणखी वाढला होता. एकाचवेळी मोठ्या संख्येने गायी दगावल्यामुळे घातपाताचा संशय बळावला होता. त्यासाठी मृत गायींचा व्हिसेरा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
मात्र, कोल्हापुरातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालानुसार शिळे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळेच गायींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत गायींच्या पोटात विषबाधेचे अंश मिळाले नाहीत, त्यामुळे घातपात नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दगावलेल्या गायींची संख्या अजूनही स्पष्ट झालेली नाही.
एवढे अज्ञान कसे?
गेल्या २५ वर्षांपासून मठावर गायी-म्हशी सांभाळल्या जातात असे सांगितले जाते. मग जनावरांना काय खायला घालावे आणि काय घालू नये एवढेही ज्ञान व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांना नाही काय? जनावरांचा सांभाळ करण्याचा सल्ला इतरांना देणाऱ्या मठावरील व्यवस्थापनाचे हे अपयश असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेंदूर सणालाही शेतकरी त्याच्याकडील जनावरांना शिजवलेला खिचडा फारसा घालत नाहीत. रवंथ करता येणार नाही, असा कोवळा हिरवा चारा घालत नाहीत. त्यामुळे मठावरील व्यवस्थापकांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
ना समिती, ना चौकशी
कणेरी मठावर गायी दगावल्यानंतर घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज अनेक संस्था, संघटनांनी व्यक्त केली. मात्र, मठासह शासन स्तरावरून याबाबत मौन बाळगण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी कोणतीही समिती नेमली नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिळे अन्न खाल्ल्यामुळेच कणेरी मठावरील गायी दगावल्याचे रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आता मठावरील कोणत्याही जनावराला औषधोपचाराची गरज नाही. यापुढे जनावरांना शिळे अन्न घालू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. - डॉ. वाय. ए. पठाण - पशुवैद्यकीय अधिकारी.