दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक
By admin | Published: June 11, 2017 01:02 AM2017-06-11T01:02:33+5:302017-06-11T01:02:33+5:30
वडणगे फाट्याजवळ कारवाई : आठजणांचा समावेश; प्राणघातक हत्यारे जप्त; पैशाच्या आमिषाने अनेकांना लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एका सराफ व्यावसायिकाच्या दुकानावर रात्रीच्या वेळी दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या परप्रांतीयांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री वडणगे (ता. करवीर) फाटा येथे जेरबंद केले. अटकेतील आठजणांपैकी दोघेजण हे कोल्हापूरचे रहिवासी आहेत. पैशांचा पाऊस पाडतो म्हणून अनेकांना या टोळीने पिस्तूल व प्राणघातक हत्यारांचा धाक दाखवून लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत पोलिसांनी दोन चारचाकी वाहने, प्राणघातक हत्यारे, सोन्यासारख्या दिसणाऱ्या पितळेच्या विटा, बिस्किटे, आदी सुमारे साडेसहा लाखांचे साहित्य जप्त केले.
अटक केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : सुधीर राचप्पा येनोळगे (५६, रा. मोरेवाडी, ता. करवीर), गणेश बळवंत पाटील (४४, रा. वडणगे, ता. करवीर), संजयकुमार रामजी शर्मा (४०, रा. फतेहपूर, ता. महू, जि. महू, उत्तर प्रदेश), सुरेंद्र बनारजी जैसवाल (३७, रा. बी-१०२, बाळकुमपाडा नं. २, गेट नं. २ ठाणे, पश्चिम, जि. ठाणे), चालक हरीश रामसाहाज शर्मा (२५, रा. हनुमान टेकडी, चाळ नं. २५, महामार्ग पोलीस चौकीनजीक, कळवा, जि. ठाणे. मूळ- ननोलिया, ता. शोहरतगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), वासूराम रामदवर जैसवार (४३, रा. चित्रकला, जवाहरनगर चाळ, पोखरण रोड, ठाणे पश्चिम, ठाणे), हवालदार तपसी सरोज (४४, रा. सिंग इस्टेट झोपडपट्टी, रोड नं. ३, कांदिवली पूर्व, मुंबई), शशिकुमार रामजी शर्मा (३१, रा. ८४१/ए, सर्वोदयनगर, अल्लापूर, इलाहाबाद, उत्तरप्रदेश).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यात चोरीचे वाढते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने दोन पोलीस पथके तयार करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता. कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गावर करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका टोळीने धुमाकूळ घातल्याची माहिती मिळाल्याने, एलसीबीच्या दोन पथकांनी, शुक्रवारी मध्यरात्री या महामार्गावर वडणगे फाटा येथे सापळा लावला होता. याचवेळी संशयित दोन आलिशान चारचाकी वाहने (एमएच ०२, बीएम २६५८; एमएच ११ एल ९०४७) एकापाठोपाठ एक वेगाने जात होती. याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने आपली वाहने या धावणाऱ्या वाहनांच्या आडवी घालून ती दोन्हीही संशयित चारचाकी वाहने थांबविली. या दोन्हीही वाहनांतील व्यक्तींना ताब्यात घेऊन वाहनांची तपासणी केली असता या वाहनांत पिस्तूल, एअरगन, तलवार, सत्तूर, चाकू, काठी अशी प्राणघातक हत्यारे तसेच बनावट सोन्याच्या विटा व बिस्किटे, आदी साहित्य मिळाले. अटक केलेल्या सर्र्वाना पोलीस ठाण्यात आणून खाक्या दाखविला असता त्यांनी वडणगेतील एका ज्वेलर्स दुकानावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याचा बेत असल्याची कबुली दिली. या टोळीकडून एकूण ६ लाख ३२ हजार ८२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक युवराज आठरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील राजू बंद्रे, जितेंद्र भोसले, श्रीकांत पाटील, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, संतोष पाटील, राजू आडूळकर, प्रकाश संकपाळ, अनिल पास्ते, संजय पडवळ, आदींनी केली.
टोळीचा परिसरात १५ दिवस वावर
करवीर तालुक्यातील वडणगे, चिखली, आंबेवाडी, निगवे, आदी परिसरात ही दरोडेखोरांची टोळी गेले १५ दिवस रात्रीच्या वेळी फिरत होती. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या टोळीच्या संशयावरून पोलिसांकडे काहींनी तोंडी तक्रारही केली होती. त्याचा आधार घेत पोलिसांनी ही कारवाई केली.
जप्त मुद्देमाल
पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन चारचाकी वाहने तसेच पिस्तूल, एअरगन, तलवार, सत्तूर, चाकू, काठी या प्राणघातक हत्यारांसह राईस पुलिंगचे साहित्य, पितळेवर मुलामा दिलेल्या बनावट सोन्याच्या विटा व बिस्किटे असे साहित्य जप्त केले.
बनावट पोलीस अधिकारी
या कारवाईतील अटकेत असलेला वडणगेचा गणेश पाटील याच्याकडे मुंबई पोलीस खात्यातील उपनिरीक्षक पदाचे बनावट ओळखपत्र आढळले. या ओळखपत्रासह राईस पुलरच्या साहित्याच्या आधारे दरोड्यादरम्यान पोलीस कारवाई झालीच तर तो पोलिसांची दिशाभूल करीत होता. त्यासाठी त्याने हे ओळखपत्र जवळ बाळगल्याची कबुली दिली. तसेच गणेश हा ‘एमपीएससी’चे क्लास घेत होता; तर सुरेंद्र जैसवाल हा मुंबईत बीएएमएस होऊन डॉक्टर म्हणून काम करीत होता.
झोपडीत पैशांचा पाऊस अन् लुबाडणूक
ही टोळी पैसे दुप्पट करून देणे, पैशांचा पाऊस पाडणे, आदी आमिषे दाखवून अनेकांना लुटत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी गणेश पाटील व सुधीर येनोळगे हे दोघे पैसे दुप्पट करून देतो म्हणून तोंडी जाहिरात करीत होते.
यानंतर विश्वास संपादन करून ठरलेल्या ठिकाणी पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीला डोळे झाकण्यास भाग पाडत होते. टोळीतील काही सदस्य संबंधितांवर नाणी टाकून पैशाचा पाऊस पडत असल्याचे चित्र उभे करत होते.
त्यानंतर पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीला हत्याराचा धाक दाखवून त्याने आणलेली रक्कम लुबाडली जात असे. त्यासाठी त्यांनी वडणगे परिसरात माळावर एक झोपडी उभारली होती. या गुन्ह्याचीही या टोळीने कबुली दिली आहे. पैसे उधळण्यासाठी आणलेली सुमारे ३० हजार रुपयांची चिल्लर नाणी या दरोडेखोरांकडून जप्त केली.