माणगावमध्ये जिल्हा परिषदेची आज स्थायी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:56+5:302021-03-19T04:22:56+5:30
कोल्हापूर : अर्थसंकल्पाच्या आधी होणारी स्थायी समितीची सभा आज, शुक्रवारी हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे होणार ...
कोल्हापूर : अर्थसंकल्पाच्या आधी होणारी स्थायी समितीची सभा आज, शुक्रवारी हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे होणार आहे. २३ मार्च रोजी सर्वसाधारण सभा असल्यामुळे या सभेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या रस्ते, पूल आणि बांधकाम विभागाच्या कामांना मंजुरी देण्यात येणार आहे.
याआधी समाजकल्याण समितीची सभा माणगाव येथे झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील सभेच्या शताब्दीनिमित्त या ठिकाणी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याची पाहणीही जिल्हा परिषदेचे पदाधिकारी करणार आहेत.
३०५४, ५०५४ आणि २५१५ या तीन योजनांमधून जिल्हा परिषद सदस्यांना रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सदस्यांनी सुचवलेल्या कामांना मंजुरी देण्यासाठी स्थायीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. या सर्व कामांना मंजुरी दिली जाणार आहे.
सुरुवातीच्या नियोजनानुसार दुपारी ४ वाजता ही सभा होणार होती. कारण सकाळी खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची सभा होणार होती. परंतु आता ही सभा ८ एप्रिल रोजी होणार असल्याचे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा स्थायी समिती ही दुपारी एक वाजता घेतली जाणार आहे.
चौकट
कोरोना खरेदी पुन्हा येणार चर्चेत
या स्थायी सभेमध्ये कोरोना काळातील खरेदी पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. औषध भांडारमधील कर्मचारी अजूनही कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. त्यांच्या बदल्या करा, अशी मागणी भाजपचे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केली आहे. यावरून पुन्हा आरोप होण्याची शक्यता आहे.