कोल्हापुरात ‘स्टार्टअप’पेक्षा ‘स्टँड-अप इंडिया’ आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 12:41 PM2022-07-06T12:41:30+5:302022-07-06T12:42:49+5:30

कोल्हापुरातून मागील तीन वर्षात विविध १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे

Standup India scheme is ahead of startups In Kolhapur district | कोल्हापुरात ‘स्टार्टअप’पेक्षा ‘स्टँड-अप इंडिया’ आघाडीवर

कोल्हापुरात ‘स्टार्टअप’पेक्षा ‘स्टँड-अप इंडिया’ आघाडीवर

googlenewsNext

संतोष मिठारी

कोल्हापूर : उद्योगाला चालना देऊन रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप आणि स्टँड-अप इंडिया योजनांची सुरुवात करून पाऊले टाकली. ‘फौंड्री हब’ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअपच्या तुलनेत स्टँडअप इंडिया योजना आघाडीवर आहे. गेल्या सहा वर्षांत एकूण ५४७ प्रकरणांसाठी बँकांनी कर्ज मंजूर केले आहेत. कोल्हापुरातून मागील तीन वर्षात विविध १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे.

केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्टँड-अप इंडिया ही योजना महिला आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदायातील उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी सुरू केली. याअंतर्गत विविध क्षेत्रातील उद्योग सुरू करण्यासाठी कोल्हापुरातील ५४७ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांना बँकांच्या माध्यमातून १३३ कोटी ३४ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून गती वाढली..

  • स्टार्टअप इंडिया योजना देखील २०१६ मध्ये सुरू झाली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअपची गती गेल्या तीन वर्षांपासून वाढली. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया पोर्टलवर कोल्हापूरमधील १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. त्यातील ३० स्टार्टअप हे नवसंशोधनाशी संबंधित आहेत.
  • शिवाजी विद्यापीठाच्या एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ६, तर सिदम इनोव्हेशन अँड बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या मार्गदर्शनाखाली १८ स्टार्टअप सुरू आहेत.
  • विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्गाने स्टार्टअप, स्टँड-अप इंडियाद्वारे उद्योग उभारणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील स्टार्टअप कंपन्या आर्थिक अडचणीत आल्याचे चित्र असताना कोल्हापूरमधील स्टँड-अप, स्टार्टअपची स्थिती चांगली दिसत आहे.
     

या क्षेत्रातील स्टार्टअप

उद्योग, कृषी, शैक्षणिक, हेल्थकेअर, फूड इंडस्ट्री, आदी क्षेत्रातील स्टार्टअप आहेत. कोरोना काळात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा, बेड, आदी वैद्यकीय साधनांचे स्टार्टअप जिल्ह्यात सुरू झाले.

स्टँड-अप इंडिया योजनेतून गेल्या सहा वर्षांत कोल्हापुरात एकूण १३३ कोटी ३४ लाख रूपयांचे कर्ज वितरण झाले आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद आहे. -गणेश गोडसे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
 

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून स्टार्टअपची गती वाढली आहे. शैक्षणिक संस्था स्टार्टअपसाठी पुढे येत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे स्टार्टअपची संख्या आणखी वाढेल. -प्रतीक ओसवाल, संचालक, सिदम इनोव्हेशन अँड बिझनेस इन्क्युबेशन सेंटर

विद्यार्थी, संशोधक, सर्वसामान्यांच्या अभिनव कल्पनांवर आधारित स्टार्टअपच्या प्रस्तावांना मार्गदर्शनासह गती देण्याचे काम शिवाजी विद्यापीठ करत आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सध्या ६ स्टार्टअप सुरू असून आणखी ४ लवकरच सुरू होतील. -डॉ. पी. डी. राऊत, सीईओ, एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन

Web Title: Standup India scheme is ahead of startups In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.