(स्टार १०३२) बापरे...! रोज ६० फेक कॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:39+5:302021-08-13T04:28:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आपण कुठून बोलता, असा लहान मुलांचा मंजूळ आवाज, तर चुकून फोेन लागला म्हणून मोठ्यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आपण कुठून बोलता, असा लहान मुलांचा मंजूळ आवाज, तर चुकून फोेन लागला म्हणून मोठ्यांची दिलगिरी, तर काही दारू ढोसून नशेत चक्क शिवीगाळ करणाऱ्या फेक कॉलमुळे पोलीस नियंत्रण कक्षाची डोकेदुखी वाढली आहे. अनेक वेळा मनोरुग्ण व्यक्तीही पोलीस नियंत्रण कक्षाचा चक्क १०० नंबर डायल करून पोलिसांची नाहक पळापळ करतात. असे फेक कॉल येण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मदतीसाठी दिवसभरात अवघे आठ ते दहा कॉल तर ६० ते ७० फेक (फसवे) कॉल चोवीस तास सेवेत असणाऱ्या नियंत्रण कक्षाला येत आहेत.
अडचणीतील व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० हा फोन क्रमांक फिरवल्यास त्याला तातडीने जागेवर जाऊन मदत करता येते, त्यासाठी गेले अनेक वर्षे १०० हा नंबर सर्वश्रुत आहे. हा नंबर तात्काळ मदत करण्यासाठी असताना अलीकडे अनेक जण त्या कॉलचा गैरवापर करण्यात समाधानी असल्याचे दिसते. घरातून लहान मुलेही हा नंबर फिरवतात व नियंत्रण कक्षालाच तुम्ही कोण बोलता आहात, अशा मंजूळ आवाजात प्रश्न विचारतात. त्यामुळे घरातील पालकांनीही सतर्क राहून असे होणारे नाहक कॉल टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
नियंत्रण कक्षाला आलेले कॉल
जून : १८६७
जुलै : २०४०
ऑगष्ट (दि. १० पर्यंत) : ६७९
दारुडे, मनोरुग्णाकडून फेक कॉल अधिक
कोल्हापूर नियंत्रण कक्षाच्या फोन नं. १०० वर प्रतिदिन ७० ते ८० कॉल येतात. त्यापैकी ६० हून अधिक कॉल हे फेक (फसवे) असतात. लहान मुलांनी घरातून डायल करणे, मोठ्याकडून चुकून झालेले तर अनेक वेळा शिवीगाळ करणारेही कॉल येतात. सायंकाळनंतर दारुडे नशेतच नियंत्रण कक्षाला फोन करून दिशाभूल करणारी माहिती देतात, तर शिवीगाळ करतात. त्याशिवाय मनोरुग्ण महिलांही काही तरी अघटित सांगून पोलीस यंत्रणेची नाहक धावपळ करतात. जे जाणून-बुजून फेक कॉल करतात, त्यांना शोधून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले जातात. इतर फेक कॉलकडे दुर्लक्ष केले जाते.
सर्वाधिक तक्रारींचे कॉल महिलांचे
घरगुती कारणांवरून अगर दारू पिऊन पती मारहाण करत आहे, शेजारी नाहक त्रास देतात, शेजारी आमच्या दारात कचरा टाकतात, पती वारंवार नाहक मारहाण करतात, सासू त्रास देते, अशा पद्धतीच्या कौटुंबिक तक्रारी महिलांकडून मोठ्या प्रमाणावर नियंत्रण कक्षाला फोनद्वारे येतात. याशिवाय कोरोना कालावधीत ज्येष्ठ नागरिकांनी मदतीसाठी पोलीस खात्याकडे याचना करणारेही फोन वाढले होते.
कोट...
अडचणीतील व्यक्तीला तातडीने मदत मिळण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने फोन नं. १०० या नियंत्रण कक्षाची २४ तास सेवा सक्रिय आहे. त्यातून अनेकांना तातडीने मदत लाभली आहे, तर नियंत्रण कक्षाला नाहक फोन करून नागरिकांनी त्याचा गैरवापर करू नये.
- जयसिंगराव रिसवडकर, पोलीस निरीक्षक, कोल्हापूर नियंत्रण कक्ष.