स्टार १०३९ : नागपंचमीला सापाला पूजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:42+5:302021-08-13T04:27:42+5:30
कोल्हापूर : नागपंचमीच्या दिवशी सापाला पूजले जाते; पण इतर दिवशी तो दिसताच त्याचा जीव घेतला जातो. वास्तवात साप हा ...
कोल्हापूर : नागपंचमीच्या दिवशी सापाला पूजले जाते; पण इतर दिवशी तो दिसताच त्याचा जीव घेतला जातो. वास्तवात साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. याबद्दल आता विविध पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे बदल होतो आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची जैवविविधता समृद्ध आहे. येथे अनेक प्रकारचे वन्यजीव आढळतात. सापांच्याबाबतीतही कोल्हापूर जिल्हा समृद्ध आहे. सरिसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी सापांच्या काही नव्या प्रजातींचा शोध लावला आहे, त्यांना त्यांचे नाव दिले आहे. अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे प्रामुख्याने आढळणाऱ्या कॅस्टोए कोरल स्नेक या अत्यंत दुर्मीळ सापाची पहिली नोंद जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून झाल्याने या जिल्ह्यातील सापांच्या यादीत भर पडली आहे.
चौकट
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
नाग, मण्यार, घोणस, फुरसे, कॅस्टोए कोरल स्नेक.
निमविषारी : हरणटोळ, मांजऱ्या.
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
बिनविषारी : नानेटी, पाण दिवड, गवत्या, अजगर, कवड्या, धामण, मांडूळ, डुरक्या घोणस, धामण, वाळा, खापरखवल्या, पहाडी तस्कर, पट्टेवाला कुकरी सर्प, रुकासर्प, काळ्या डोक्याचा सर्प.
चौकट
साप आढळला तर...
मानवी वस्तीत साप आढळून आला तर तत्काळ नोंदणीकृत सर्पमित्रांशी अथवा वन विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. घाबरून न जाता सापापासून सुरक्षित अंतर ठेवावे. पाळीव प्राणी अथवा लहान मुलांना दूर ठेवावे, सापाला डिवचू नये अथवा मारू नये. सापाच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. सर्पमित्र आल्यानंतर त्याला सहकार्य करावे. सर्पमित्र उपलब्ध नसल्यास साप पकडण्याचा प्रयत्न करू नये.
चौकट
साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र
खरेतर साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. देशाच्या धान्य उत्पादनातील पाच टक्के हिस्सा उंदीर फस्त करतात. उंदरावर नियंत्रणाचे काम नाग, धामण यासारखे साप करत असतात. त्यामुळेच ते शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने आपले मित्र आहेत.
कोट
आपल्या जिल्ह्यात सापांची संख्या जास्त आहे. त्यातून बहेतुक बिनविषारी आहेत. साप हे सस्तन प्राणी नाहीत. त्यामुळे ते दूध पीत नाहीत. त्यांना आवाजाचे ज्ञान जमिनीतील कंपनांमुळे होते. त्यांना गंधज्ञान असते. ते एकाचवेळी दोन्ही डोळ्यांनी वेगवेगळी दृश्ये पाहत असतात. हलणाऱ्या वस्तू त्यांचे लक्ष वेधून घेतात. सर्वच साप हे विषारी नसतात, त्यामुळे घाबरून जाऊ नका. जवळच्या सर्पमित्रांना बोलवा.
- दिनकर चौगुले, सर्पमित्र.
----------------------------------
(संदीप आडनाईक)