स्टार - १०४१ ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:57+5:302021-08-18T04:28:57+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऐन श्रावणात साखरेच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली आहे. बऱ्याच कालावधीतनंतर ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ऐन श्रावणात साखरेच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली आहे. बऱ्याच कालावधीतनंतर साखरेच्या दरात वाढ झाली असून उत्तर प्रदेशमधील मार्केटमधून मागणी वाढल्याचा परिणाम दिसत आहे. साखर उद्योगाला दिलासा मिळाला असला तरी ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेच्या दरात वाढ झाल्याने सणाचा गोडवा काहीसा कमी झाला आहे.
एका बाजूला इंधनाचे दर गगनाला भिडल्याने जीवनाश्यक वस्तूंच्या दरावर त्याचे परिणाम दिसत होते. साखरेच्या दरावर परिणाम झाला नव्हता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून साखरेचे दर काहीसे हलू लागले आहेत. सध्या श्रावण महिना सुरू आहे, आता सणासुदीला सुरुवात झाल्याने साखरेची मागणीही वाढते. त्यातच साखरेचे उत्पादन अधिक घेणाऱ्या उत्तर प्रदेश मार्केटमधून मागणी वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील साखरेचे दर घसरण्यास उत्तर प्रदेशमधील मार्केट कारणीभूत होते. महाराष्ट्राची साखरेची बाजारपेठ असलेली ईशान्यकडील राज्ये उत्तर प्रदेशने ताब्यात घेतल्याचा फटका महाराष्ट्रातील साखर उद्योगाला बसला आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील मार्केटमध्ये साखरेची मागणी वाढल्याने येथील साखरेला चांगला भाव मिळू लागल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. त्यातही ‘एम’ साखरेचा तुटवडाही दरवाढीसाठी कारण सांगितले जात आहे. सध्या घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३२५० ते ३३०० रुपये दर आहे. जी साखर ३ हजाराने विकावी लागली होती, तिला आता भाव चांगला मिळत असल्याने साखर उद्योगाला दिलासा मानला जात आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात साखरेने उसळी घेतल्याने सणाचा गोडवा काहीसा कमी झाल्याचे गृहिणीचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्ची साखरेची उसळी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेच्या दरावर देशांतर्गत साखरेचे दर हलत असतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा साखरेने चांगलीच उसळी घेतली आहे. क्विंटलमागे २५० रुपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम पांढऱ्या साखरेच्या दरावर झाला आहे.
साखरेच्या दरात आणखी वाढ होणार
आगामी सणासुदीचे दिवस आणि साखरेची उपलब्धता पाहता, भविष्यात साखरेच्या दरात वाढच होत राहील. साधारणत: क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची वाढ होईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.
कोट-
अगोदरच गोडे तेलासह इतर जीवनाश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यात आता साखरेच्या दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळे सण करायचे की नाही? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
- सुनीता डवरी (गृहिणी, शिवाजी पेठ)