स्टार १०९७..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:07+5:302021-08-28T04:29:07+5:30
समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘डोळे हे जुलमी गडे, रोखुनि ...
समीर देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘डोळे हे जुलमी गडे, रोखुनि मज पाहू नका’ असे कविवर्य भा. रा. तांबे यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. काळेभोर, निळे या विशेषणांनी डोळ्यांची सुंदरता विशद केली जाते. चित्रपटातील नायिकांच्या डोळ्यांवर तर अनेकजण फिदा झाल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत आपले डोळे अधिक सुंदर दिसावेत यासाठी विविध कॉन्टॅक्ट लेन्सचाही वापर सुरू झाला आहे. तसेच चष्म्याची अडचण वाटू लागल्याने ‘लेन्स’चा वापर सर्रास सुरू झाला आहे. परंतु या लेन्स वापराचे काही नियम आहेत. ते जर पाळले नाहीत, तर मात्र डोळ्यांना इजा होऊ शकते. हे लक्षात घेण्याची गरज आहे.
वयाच्या ४० वर्षांनंतर शक्यतो चष्मा लागला की, ‘चाळशी लागली’ असा शब्दप्रयोग करण्यात येत असे. गेल्या २५ वर्षांपूर्वीच्या काळाचा विचार केला, तर त्यावेळी मुळात चष्माच उशिरा लागत असे. परंतु तो लागला की वापरलाही जात असे. मात्र त्यानंतर विविध कारणांनी तरुणपणीही चष्मा लावण्याची वेळ आली. मग सुरुवातीच्या काळात मुलींसाठी चष्म्याऐवजी लेन्स वापरण्याची पध्दत सुरू झाली. आता तर याचा सर्रास वापर सुरू केला असून एकीकडे चष्म्याला पर्याय म्हणून त्या वापरल्या जाऊ लागल्या, तर दुसरीकडे डोळ्यांचा रंग आकर्षक दिसावा यासाठीही वापर सुरू केला.
मात्र या लेन्स वापरताना काही काळजी घेण्याची गरज आहे. बुबुळाला चिकटून बसणाऱ्या या लेन्सही दक्षता नाही घेतली तर डोळ्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळेच लेन्स वापरणाऱ्यांनी जाणीवपूर्वक याची जी काही पथ्ये आहेत, ती पाळण्याची गरज आहे.
चौकट
चष्म्याला करा बाय बाय
चष्म्याला एक उत्तम पर्याय म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स पुढे आल्या. दृष्टीमधील स्पष्टता, अचूकता, तसेच चष्मा वागवण्यापेक्षा या लेन्स अतिशय उपयुक्त ठरतात. मात्र या लेन्स वापरताना तितकीच काळजी घेण्याची गरज आहे. चेहऱ्याची शोभा जरी या लेन्स वाढवत असल्या तरी, दुर्लक्षामुळे डोळ्याचे आरोग्य बिघडू नये, हेही पाहण्याची गरज आहे.
चौकट
ही घ्या काळजी...
१ लेन्स ही शक्यतो १२ तासापेक्षा अधिक वापरू नये. तशी ती वापरल्यास डोळ्यांना आवश्यक असणारा ऑक्सिजन मिळण्यावर मर्यादा येतात.
२ लेन्स घालताना आणि काढताना हात साबणाने स्वच्छ धुण्याची गरज आहे. अन्यथा डोळ्यांना जंतू संसर्ग होऊ शकतो.
३ ठराविक काळानंतर लेन्स न बदलल्यास पापणीखाली ‘पॅपिला’ नावाचा कणीदार थर निर्माण होतो.
४ झोपताना लेन्स वापरू नयेत. अन्यथा ‘क्लेअर’सारखा आजार हाेण्याची शक्यता असते.
कोट
लेन्स बसवायच्या आणि नंतर त्याची पथ्ये पाळायची नाहीत, असे करून चालत नाही. यामुळे बुबुळाला जखम होऊ शकते. जंतू संसर्गामुळे डोळ्यात फूल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छता, सोल्युशन्सचा वापर, डॉक्टरांचा सल्ला याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे.
- डॉ. अतुल जोगळेकर, नेत्ररोगतज्ज्ञ
कोट
कॉन्टॅक्ट लेन्स या नियमित वापरल्या आणि दक्षता घेऊन वापरल्या, तर त्रासदायक ठरत नाहीत. परंतु प्रासंगिक वापरल्या, तर ते त्रासाचे होऊ शकते. नागरिक लेन्स बसवून घेतात, परंतु त्याबाबतीत म्हणावी तशी काळजी घेत नाहीत, असे माझे निरीक्षण आहे.
- डॉ. श्रीकांत कुलकर्णी, नेत्ररोगतज्ज्ञ