स्टार ११०५- प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयांनाच ‘कळा,’खासगीकडेच अनेकांचा ओढा भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:14+5:302021-09-02T04:51:14+5:30
कोल्हापूर: केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागांनी कितीही सोयी आणि सुविधा दिल्या तरीही अजूनही शासकीय रुग्णालयांमधील प्रसूतीचा आकडा ...
कोल्हापूर: केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागांनी कितीही सोयी आणि सुविधा दिल्या तरीही अजूनही शासकीय रुग्णालयांमधील प्रसूतीचा आकडा फारसा वाढत नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या सात महिन्यांच्या काळात एकूण झालेल्या प्रसूतींपैकी जवळपास ७० टक्के प्रसूती खासगी रुग्णालयांमध्ये झाल्याचे चित्र समोर आले आहे. अगदीच ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे अशाच कुटुंबातील महिला शासकीय रुग्णालयांमध्ये जात असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयांच्या अंतर्गत येणारी १३ उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आहेत. कोल्हापूर शहरामध्ये छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारे सीपीआर हॉस्पिटल आहे. तसेच कोल्हापूर महापालिकेची सावित्रीबाई फुले आणि पंचगंगा ही दोन रुग्णालये कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी प्रसूतीच्या सुविधा आहेत. असे असले तरी या सात महिन्यांमध्ये झालेल्या एकूण २९ हजार ३८४ प्रसूतींपैकी तब्बल २२ हजार ७३९ प्रसूती खासगी रुग्णालयांमध्ये झाल्या आहेत तर ६ हजार ७०५ प्रसूती शासकीय आरोग्य संस्थांमध्ये झाल्या आहेत.