(स्टार १११३) ‘खाकी’ डागाळली, आठ पोलीस अधिकारी दोन कर्मचारी जाळ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:00+5:302021-09-02T04:53:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्याच पोलीस विभागाचा लाच स्वीकारण्यात कोल्हापूरसह पुणे विभागात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्याच पोलीस विभागाचा लाच स्वीकारण्यात कोल्हापूरसह पुणे विभागात दुसरा नंबर लागतो. खात्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे ‘खाकी’ डागाळली आहे. २०२० मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात टाकलेल्या २७ छाप्यापैकी ६ छापे पोलिसांवर आहेत. तर ऑगस्ट २०२१ पर्यंत मात्र दोनच पोलीस ‘लाचे’च्या जाळ्यात अडकले.
कोरोना महामारीचे संकट सर्वसामान्यावर घोंगावत असतानाही लाचखोरीचा आकडा कमी झाला नाही. लाचेशिवाय कामेच करायची नाहीत असा काही शासकीय कर्मचार्यांनी पावित्रा घेतल्याचे कारवाईवरून दिसते. कोरोना कालावधीत दोन महिने शासकीय कार्यालये बंद व अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर सुरू होती, त्यावेळी लाचखोरी कमी झाल्याचे छापासत्रावरून दिसते. २०२० मध्ये जिल्ह्यात लाचप्रकरणी पोलिसांवर ६ छापे टाकले. त्यामध्ये ७ पोलीस अधिकारी व १ पोलीस कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकले. तर २०२१ मध्ये फेब्रुवारी आणि जूनमध्ये दोन छाप्यात पोलीस उपनिरीक्षक व पोलीस नाईक असे दोघेच लाच घेताना सापडले.
२०२१ मधील ‘लाचे’च्या कारवाई
जानेवारी : ०२
फेब्रुवारी : ०३
मार्च : ०२
एप्रिल : ००
मे : ००
जून : ०३
जुलै : ०२
ऑगष्ट : ०४
एकूण कारवाई
२०१८ : ३४
२०१९ : ३१
२०२० : २७
२०२१ (ऑगस्टपर्यंत) : १६
दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत लाच
पदोन्नतीपाठापाठ ५ हजारांची लाच
फेब्रुवारी २०२१ मध्ये वडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकात भोसले ५ हजारांची लाच घेताना अडकले. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्ती केलेल्या गुन्ह्याच्या तपास कामात तक्रारदारास मदत करण्यासाठी लाच घेताना ते सापडले. त्यांची उपनिरीक्षकपदी नुकतीच पदोन्नती झाली होती.
वाढदिवसाचा गुन्हा, अन् दोन हजारांची लाच
कोरोना निर्बंधात जून २०२१ मध्ये सामूहिक वाढदिवस दिवस केला म्हणून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार घेतले, उर्वरित ३ हजारांसाठी तगदा लावला, ते घेऊन येण्यास तक्रारदारास सांगितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस नाईक शेखर शिंदे याच्यावर कारवाई केली.
मटकेवाल्याकडूनही घेतली ६० हजारांची लाच
सप्टेंबर २०२० मध्ये राजारामपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण (डी.बी) पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव यांच्यासह पोलीस कर्मचारी व पंटर ६० हजारांच्या लाचप्रकरणी जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे, मटका व जुगाराच्या गुन्ह्यात तक्रारदाराला सहआरोपी न करण्यासाठी ही लाच घेताना कारवाई झाली.
लाच मागितली जात असेल तर संपर्क करा...
शासकीय कार्यालयात कामांबाबत जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्या अगर १०६४ ला फोन करा. तक्रार केल्यामुळे तुमच्या कामात कोठेही अडचणी येणार नाहीत, ते रितसर पूर्ण होईल, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.