स्टार ११३४ : शेजाऱ्यांकडून वीज घेतली तरी दाखल होतो चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:43+5:302021-09-04T04:27:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल ...

Star 1134: Even if electricity is taken from neighbors, theft is registered | स्टार ११३४ : शेजाऱ्यांकडून वीज घेतली तरी दाखल होतो चोरीचा गुन्हा

स्टार ११३४ : शेजाऱ्यांकडून वीज घेतली तरी दाखल होतो चोरीचा गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल तर तोही गुन्हा ठरतो. अनधिकृत वीज वापर या नावाखाली महावितरणकडून दंडाची व अटकेची कारवाई होऊ शकते. अशा नकळत होणाऱ्या चुकांमुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १४१ ग्राहकांना कारवाईच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले असून ४३ लाख ९६ हजारांची दंडाची रक्कमही आकारण्यात आली आहे.

वीज चोरी हा मोठा गुन्हाच आहे, त्यावर कारवाई होते हे माहीत असूनदेखील गुन्हे केले जातात. यातून महावितरणचे नुकसान तर होतेच, शिवाय चोरी केल्याचे आढळल्यास वापरलेल्या विजेच्या सहापट रक्कम दंड भरावी लागत असल्याने ग्राहकांनाही मोठा आर्थिक झटका बसतो. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५ हजार ४६६ कनेक्शनची तपासणी महावितरणकडून झाली. त्यात १८१ ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत वीज जोडणी केल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणने सर्व सोपस्कार पूर्ण करत यांच्यावर कारवाई करत तब्बल ४३ लाख ९६ हजारांची दंडाची रक्कम आकारणी केली. यातील १७१ प्रकरणात ३० लाख ९२ हजारांची रक्कम आतापर्यंत वसूलही करण्यात महावितरणच्या यंत्रणेला यश आले आहे.

महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई

अनधिकृत वापर

तपासणी केलेल्या वीज जोडण्या : १५ हजार ४६६

अनधिकृत आढळलेल्या जोडण्या : १८१

आकारलेली दंडाची रक्कम : ४३ लाख ९६ हजार

वसूल केलेली रक्कम : ३० लाख ९२ हजार

कायदा काय सांगतो?

विद्युत कायदा २००३ कलम १३५ व १३६ नुसार आकडे टाकून, वीज मीटरमध्ये फेरफार, अनधिकृत वीज जोडणी हे सर्व वीज चोरीत अंतर्भूत करण्यात आले आहे. पहिल्या वेळी चोरी केल्याचे निदर्शना आल्यास तीनपट तर दुसऱ्या वेळी चोरी आढळल्यास सहापट दंडाची तरतूद आहे. शिवाय ३ ते ५ वर्षांची कैदेची शिक्षादेखील या कायद्यानुसार आहे.

चोरी कळवा दंडातील १० टक्के रक्कम मिळवा

विजेची चोरी होत असल्याचे कळवणाऱ्या व्यक्तीला महावितरणकडून बक्षीस म्हणून वसूल केलेल्या दंडातून १० टक्के रक्कम दिली जात होती. २०१९ पर्यंत ही सवलत कायम होती, आता यात थोडा बदल करून ती प्रोत्साहनपर रक्कम म्हणून दिली, आताही दिली जाते.

प्रतिक्रिया

महावितरणने घालून दिलेल्या नियमानुसार आणि मंजूर केलेल्या भाराच्या प्रमाणातच विजेचा वापर करावयाचा आहे. बिलाच्या बाबतीत काही तक्रारी असल्यास महावितरण त्यात तडजोड करते; पण अनधिकृत वीज कनेक्शनच्या बाबतीत नेहमीच कठोर निर्णय घेते. त्यामुळे ग्राहकांनी नाचक्की टाळण्यासाठी अशा प्रकारची चोरी करूच नये.

-किशोर खोबरे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कोल्हापूर परिमंडळ

Web Title: Star 1134: Even if electricity is taken from neighbors, theft is registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.