स्टार १२००...पैसा झाला खोटा... दहा रुपयांचे नाणे चालेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:43+5:302021-09-21T04:25:43+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याने नागरिकांमध्ये ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. दहा रुपयांचे नाणे बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याने ते नाणे घेण्यास प्रत्येक ठिकाणी नकार दिल्याने नागरिक व व्यावसायिकांमध्ये वादाचे प्रसंग येत आहेत. त्यातच नाणे हे हाताळण्यास अवघड असल्याचे कारणही पुढे आले आहे.
पूर्वी चार आणे, आठ आणे, रुपयाची नाणी चलनात होती. त्यानंतर दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये आणि आता वीस रुपयांचे नाणे चलनात आले आहे. मात्र नाणे घेण्यासाठी नागरिकांमधून टाळाटाळ होत आहे. साधारणता फळ विक्रेत्यांसह छोटे छोटे व्यावसायिक नाणे घेण्यास फारसे उत्सुक नसतात. पर्यटनस्थळीही नाणी स्वीकारण्यास कोणी तयार नसते, असेही नागरिकांमधून सांगण्यात आले. त्यातून व्यावसायिक व नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग ओढावतात. अलीकडे तर दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. दहा रुपयांची दहा नाणी खिशात घेऊन फिरणे जोखमीचे असते, त्याऐवजी शंभर रुपयांची एक नोट हाताळणे सोपे असल्याने नाणे स्वीकारण्यास तयार नसतात.
रिझर्व्ह बॅँकेने अलीकडेच वीस रुपयांचे नाणे बाजारात आणले आहे. लवकरच ५० व १०० रुपयांचे नाणे येत असून त्यामुळे बॅँकांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.
बॅँकांत कोट्यवधीची नाणी पडून
नोटबंदीनंतर बाजारात १० रुपयांच्या नाण्याची संख्या वाढली. आजही बँकांकडे नाण्यांचे पाऊच शिल्लक आहेत. यासाठी भारतीय स्टेट बँक नागरिकांना नाणे घेऊन जाण्याचे आवाहन करत आहे; पण नाण्यांच्या त्रासातून बँकांची सुटका होत नसल्यामुळे बॅँकांसमोर पेच निर्माण झाला आहे.
नाण्यांची देवाणघेवाण गरजेची
रिझर्व्ह बॅँकेतून येणारे प्रत्येक नाणे हे फिरत राहिले पाहिजे, तरच बॅँकांवरील नाण्यांचा ताण कमी होऊ शकतो. मात्र एखाद्या ठिकाणी नाणे स्वीकारणे थांबले तर, साठा वाढत जातो, तेच सध्या बँकिंग क्षेत्रात पाहावयास मिळत आहे.
म्हणून नाणे रिझर्व्ह बॅँकेच्या दृष्टीने फायद्याचे
नोटा हाताळण्यास सोप्या असल्या तरी जितक्या हाताळल्या जातील, तेवढ्या लवकर खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. नवीन नोटा छपाईसाठी मोठा खर्च होतो. त्यामुळेच नोटा ऐवजी नाणे रिझर्व्ह बॅँकेच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
कोट-
दहा रुपये नाणे बंदच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. सर्वांनी नाणे स्वीकारणे गरजेचे आहे.
- गणेश शिंदे (व्यवस्थापक, अग्रणी बॅँक, कोल्हापूर)