स्टार ७९४ - ३८३ गावात रोजगार हमीची पाटी कोरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:02+5:302021-06-09T04:31:02+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेकारी वाढल्याने राज्य शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेकारी वाढल्याने राज्य शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तब्बल ३८३ गावांत ‘रोहयो’ची पाटी कोरीच आहे. गेल्या सव्वादोन महिन्यांत या गावात या योजनेंतर्गत एकही काम झाले नसून, उर्वरित गावात अकुशल मजुरांवर २ कोटी ४५ लाख रुपये खर्च झाला आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. गेली दीड वर्षे कोरोनाने अनेकांचा रोजगार गेला आहे. उद्योगासह छोटे व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ नागरिकांवर आली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामांना प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील १०३० ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. मात्र, तब्बल ३८३ गावांत रोजगार हमीची पाटी कोरीच राहिली आहे. या गावांत या योजनेतून एकही काम झालेले नाही.
तालुकानिहाय २०२१-२२ मध्ये ‘रोहयो’मध्ये पाटी कोरी असणाऱ्या गावांची संख्या
तालुका एकूण ग्रामपंचायत शून्य काम झालेल्या ग्रामपंचायती
आजरा ७४ २८
गगनबावडा २९ १०
भुदरगड ९७ २८
चंदगड ११० ३८
गडहिंग्लज ८९ २४
हातकणंगले ६२ २१
कागल ८३ १५
करवीर ११८ ५९
पन्हाळा १११ ६३
राधानगरी ९८ १४
शाहूवाडी १०६ ६४
शिरोळ ५३ १९
शाहूवाडीत ६० टक्के ग्रामपंचायतीत शून्य टक्के काम
राधानगरी तालुक्यातील ९८ पैकी १४ (१४ टक्के) शाहूवाडी तालुक्यातील १०६ पैकी तब्बल ६४ गावांत (६० टक्के) ग्रामपंचायतीमध्ये शून्य टक्के काम झाले आहे. पन्हाळा, करवीर तालुक्यांतही तुलनेने गावे अधिक आहेत.
तालुनिहाय मंजूर कामे
तालुका ग्रामपंचायतीकडे इतर यंत्रणेकडे
शाहूवाडी १९१ ३४७
पन्हाळा २३४ ५
हातकणंगले ४०० १९
शिरोळ ३१९ ०
करवीर २२४ ८
गगनबावडा १६८ १
राधानगरी १५३ ५२६
कागल ६७ २००
भुदरगड २४८ ४६७
आजरा १५२ ३
गडहिंग्लज ४८७ १०२
चंदगड ३०५ २२
एकूण २९४८ १७००
कोट-
कोरोनामुळे गावपातळीवरील शासकीय यंत्रणा आरोग्य सेवेत व्यस्त आहे. त्यामुळे ‘रोहयो’ कामांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मात्र, ज्या गावात एकही काम सुुरू झालेले नाही, तिथे प्राधान्यांना कामे सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
- दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी, ‘रोहियो’
पाणंद रस्त्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी कामे करण्याचा आमचा प्रयत्न होता; मात्र शासकीय पातळीवरून काहीच प्रतिसाद मिळत नाही.
- योगेश ढेंगे, सरपंच, नागदेववाडी
प्रस्ताव द्यायला तांत्रिक अडचणीच ढीगभर आहेत. कामे भरपूर करायची आहेत, शासनाकडे पैसाही पडून आहे; मात्र तांत्रिक पातळीवर कामेच करता येत नाहीत.
- सुभाष पाटील, सरपंच, सिरसे