स्टार ८०७ (नियोजनातील विषय) ‘रेल्वे’ काही केल्या रूळावर येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:20+5:302021-06-16T04:31:20+5:30
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स अर्थात कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकातून कधीकाळी मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, ...
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स अर्थात कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकातून कधीकाळी मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, अशा विविध ठिकाणी १६ पेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावत होत्या. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आजपर्यंत केवळ तीनच रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यातही प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी कोल्हापूरचे रेल्वे स्थानक सुनेसुने पडले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सध्या तरी कोल्हापुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या रूळावर येतील अशी चिन्हे नाहीत.
या रेल्वे स्थानकातून मुंबईला व्यापाऱ्यानिमित्त जाणाऱ्या व सरकारी नोकऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे महालक्ष्मी, सह्याद्री, कोयना, या तिन्ही रेल्वेचे आरक्षण ओसंडून वाहत होते. अनेक प्रवाशांना प्रवास करण्यासाठी प्रतीक्षायादीवरच राहावे लागत होते. महिनोमहिने या मार्गावरील सर्व रेल्वेचे आरक्षण आगाऊच फुल्ल होत असे. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून प्रवाशांचा ओघ कमी झाला. त्यात प्रतिसादाअभावी महालक्ष्मी, सह्याद्री आणि काही दिवसांपूर्वी कोयनाही बंद करण्यात आली आहे.
मुंबई मार्गावर प्रवासी मिळेनात
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मुंबईतील बहुतांशी बाजारपेठ बंद असल्यामुळे व्यापारीवर्ग प्रवास करेनासा झाला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद अल्प लाभत आहे. याच कारणामुळे महालक्ष्मी, सह्याद्री या रेल्वेगाड्या प्रथम बंद केल्या.
या रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे अशा,
- कोल्हापूर-सोलापूर
-कोल्हापूर-हैदराबाद
-कोल्हापूर-मुंबई (सह्याद्री)
- कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी)
- कोल्हापूर-मुंबई (कोयना)
- कोल्हापूर-महाराष्ट्र
- कोल्हापूर-निजामुद्दीन (दिल्ली)
- कोल्हापूर - राणी चन्नम्मा
- कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस
- कोल्हापूर-नागपूर
- कोल्हापूर : दिक्षाभूमी
- कोल्हापूर : हरिप्रिया (तिरुपती)
- कोल्हापूर -पुणे (पॅसेंजर)
-कोल्हापूर -मिरज (पॅसेंजर)
- कोल्हापूर-सातारा (पॅसेंजर)
-कोल्हापूर -बिदर
सर्वाधिक वेटिंग धनबादसाठी
या रेल्वेस्थानकातून सुटणाऱ्या महाराष्ट्र, हरिप्रिया या रेल्वे गाड्यांकडे प्रवाशांनी कोरोनाच्या भीतीमुळे पाठ फिरविली आहे तर धनबादला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. उत्तर भारतातील अनेक नागरिक कोल्हापुरात ठेकेदारी पद्धतीनुसार अंगावर काम घेऊन मजुरीसारखी कामे करतात. त्यामुळे हेच मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी कोल्हापूर-धनबाद या रेल्वेला पसंती देत आहेत. अनेक प्रवाशांना आरक्षण न मिळाल्यामुळे प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, ही रेल्वे कोल्हापूरकडे धावताना मोकळी येत आहे. हाही रेल्वे प्रशासनाचा चिंतेचा विषय बनला आहे.
नोकरदारांना पॅसेंजरची प्रतीक्षा
कोल्हापूर ते मिरज , कोल्हापूर ते सातारा या मार्गावरील पॅसेंजरला नोकरदार वर्गाकडून मागणी अधिक आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नोकरदारांना या पॅसेंजर रेल्वे सोयीच्या पडतात. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे या पॅसेजर एक्स्प्रेस सुरू करण्यास अद्यापही मंजुरी दिलेली नाही. स्थानिक अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे.
फोटो : १४०६२०२१-कोल-रेल्वे
आेळी : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानक सुनेसुने पडले आहे.
(छाया : नसीर अत्तार)