(स्टार ८४२ नियोजनातील विषय)साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:29+5:302021-06-26T04:17:29+5:30

कोल्हापूर: बाजारात साखरेपेक्षा गुळालाच जास्त भाव आहे. आधी गूळ गरिबांसाठी आणि साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. हे गणित आता ...

(Star 842 planning topics) I eat jaggery more than sugar | (स्टार ८४२ नियोजनातील विषय)साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

(स्टार ८४२ नियोजनातील विषय)साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

Next

कोल्हापूर: बाजारात साखरेपेक्षा गुळालाच जास्त भाव आहे. आधी गूळ गरिबांसाठी आणि साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. हे गणित आता उलटे झाले असून आरोग्याच्या दृष्टीने जास्तच सजगता आल्याने गुळाचा आहारात आवर्जून वापर होत आहेत. त्यातच गूळ पावडर, वडीच्या स्वरूपात मिळत असल्याने त्याची साठवणूक व वापरही सोईस्कर झाल्याने दैनंदिन वापरही वाढला आहे. साहजिकच गेल्या पाच वर्षात साखरेपेक्षा गुळाचा दर जास्त झाला असून ही दोन्हीतील तफावत १० ते १५ रुपयांची राहिली आहे.

गूळ हा आरोग्यवर्धक असल्याने भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय आहारात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणताही सण गुळाशिवाय पूर्णच होत नाही. त्यातही कोल्हापूर तर गुळाचे कोठारच. जिथे पिकते तिथे खपत नाही, असे म्हणतात याची वारंवार प्रचिती येते ही एक आणखी एक दुसरी बाजू. कधीकाळी येथे साखर कारखान्यापेक्षा गुळाची बाजारपेठ समृध्द होती, पण अलीकडे गुऱ्हाळघरे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिली आहे तर साखर कारखाने खंडीभर झाली आहेत. त्यामुळे बाजारातही साखरेचीच मागणी जास्त आहे. पण जसजसे साखरेचे दुष्परिणाम समोर लागले तसे तसेच आरोग्याच्या बाबतीत सजग लोकांच्या घरातून साखर हळूहळू हद्दपार होत गेली आणि त्याची जागा गुळाने घेतली.

घरात अलेल्या पाहुण्याला गूळ आणि पाणी देण्याची आपल्याकडे प्रथा होती, पण साखरेचे अतिक्रमण वाढले तसे त्याची जागा चहाने घेतली. आज चहा जगण्यातील अविभाज्य भाग बनला आहे, पण पुन्हा एकदा गुळाला जुने दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातूनच त्याच्या दरातही वाढ झाल्याचे गेल्या चार पाच वर्षातील चित्र आहे. साखर ३५ ते ३६ रुपये प्रति किलोचा दर आहे, याच वेळी गूळ मात्र ४५ ते ५६ रुपये किलोने विकला जात आहे. म्हणजे साखरेपेक्षा गुळाला चांगला दर आला आहे.

१) ग्राफ

असा वाढला गुळाचा भाव (प्रती किलो दर)

साल गुळाचा दर

साल साखर गूळ

२००० १८ ते २२ ३० ते ३२ रुपये

२००५ २५ते २७ ३० ते ३५ रुपये

२०१० २७ ते ३२ ३६ ते ४० रुपये

२०१५ २५ ते ३० ४० ते ४५ रुपये

२०२० ३५ते ३८ ५० ते ७० रुपये

२०२१ ३६ ते ३८ ४५ ते ५६ रुपये

२) गुळाचा चहा बनले स्टेटस

पूर्वी साखर घेण्याची ऐपत नसलेल्यांच्या घरात गुळाचा चहा केला जाई, कालौघात लोकांच्या हातात पैसा आणि घरातून गुळाचा चहा हद्दपार झाला, तो फक्त म्हाताऱ्या माणसांच्या आठवणी पुरताच उरला. पण अलीकडे गुळाचा चहा हा आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्याचे कळल्यापासून गुळाचा चहा पिणे हा स्टेटस सिम्बाॅल झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी गुळाचा चहा विक्री करणारे सेंट्रर्स उभी राहिली आहेत. लोक जादा पैसे मोजून ते आवडीने पीत देखील आहेत.

प्रकृतीसाठी गूळ चांगला

गूळ हा उष्ण असलातरी भरपूर कॅलरीज आणि कॅल्शिअम असल्याने तो आरोग्यवर्धक आहे. त्याचे रोजच्या आहारात सेवन गरजेचे आहे. त्याचा अतिरेकही टाळायला हवा

डॉ. झुंजार घाटगे

गुळाची मागणी जैसे थे

गूळ हा आरोग्य दृष्टीने कितीही चांगला असलातरी त्याचा टिकाऊपणा कमी असल्याने सणावारालाच मागणी असते. रोजच्या रोज गुळाची खरेदी करणारे ग्राहक खूपच तुरळक आहेत. त्यातच दरही जास्त आहे. एक किलोच्या गुळाच्या बदल्यात दीड किलो साखर येत असल्याने आणि गूळ हा साखर मिश्रीत तयार होत असल्याने ग्राहक गुळाची मागणी फारशी करत नाहीत.

माधुरी केसरकर, जाधववाडी

गूळ उत्पादकांचे अर्थकारण सुधारले

गुळाला बाजारात वर्षभर चांगली मागणी असल्याने दरही बऱ्यापैकी ३९०० ते ४३०० रुपये क्विंटलवर स्थिर राहिले आहेत. त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या गुळाला बाजारातही चांगला दर मिळत असल्याने उत्पादकांच्याही पदरात चार पैसे जास्त पडत असल्याने त्यांचेही अर्थकारण बऱ्यापैकी सुधारले आहे.

Web Title: (Star 842 planning topics) I eat jaggery more than sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.