स्टार ८४४ कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ ने वाढवली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:19+5:302021-06-27T04:16:19+5:30
कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट अजूनही आटोक्यात आली नसताना दुसरीकडे ‘डेल्टा प्लस’ने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. ...
कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट अजूनही आटोक्यात आली नसताना दुसरीकडे ‘डेल्टा प्लस’ने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. आरोग्य क्षेत्राबरोबरच जनतेमध्येही या नव्या स्वरूपातील विषाणूबाबत भीती निर्माण झाल्याचे जाणवत आहे.
गेल्या मार्चपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट सुरू झाली. ऑक्टोबरनंतर ही संख्या कमी झाली. परंतु पुन्हा जानेवारी २१ नंतर कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आणि यंदाच्या मे महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले. गतवर्षीपेक्षा दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये रुग्णाना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासली. त्यामुळे सध्या महाराष्ट्र शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात ऑक्सिजन प्रकल्प उभारले जात आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना कोल्हापूरच्या शेजारी रत्नागिरी जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’चे ९ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून तो देशातील पहिला बळी ठरला आहे.
या नव्या विषाणूची तपासणी पुण्यातील दोन राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये केली जाते. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक आठवड्याला काही स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येतात. याच ठिकाणी या विषाणूच्या बदलत्या स्वरूपाचा अभ्यास केला जातो.
चौकट
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे आतापर्यंतचे रुग्ण/ १ लाख ४९ हजार २७८
कोरोनामुक्त नागरिकांची संख्या /१ लाख ३४ हजार ०१२
आतापर्यंत झालेले/ मृत्यू ४ हजार ५८४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण/१० हजार ६८२
चौकट
सध्या जिल्ह्यात एकही ‘डेल्टा प्लस’चा एकही रुग्ण नाही. तरीही याबाबत केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ज्या सूचना येतात त्याची टिपणे ठेवण्यात येत आहेत. सातत्याने याबाबत ऑनलाईन बैठका होत असून या स्वरूप बदललेल्या विषाणूबाबत पुणे येथील प्रयोगशाळांकडून थेट दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला माहिती दिल्याचे सांगण्यात आले.
चौकट
सध्या गेल्या आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. २५ हजारांपासून ३३ हजारांपर्यंत या चाचण्या करण्यात आल्या आहेत. २५ जून रोजी संपलेल्या २४ तासात २५ हजार ४१८ चाचण्या घेण्यात आल्या. तर त्यापैकी २११९ नागरिकांचे अहवाल........................... पॉझिटिव्ह........................................... आले आहेत.