स्टार ८५३ : गाव कोराेनामुक्त, तरीही शाळेला कुलूपच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:28+5:302021-06-30T04:16:28+5:30
कोल्हापूर : राज्य शासनानेच सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश काढल्याने गाव कोरोनामुक्त असले तरीदेखील जिल्ह्यातील ५ वी ते ...
कोल्हापूर : राज्य शासनानेच सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश काढल्याने गाव कोरोनामुक्त असले तरीदेखील जिल्ह्यातील ५ वी ते ८ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १६ जुलैपर्यंत कुलूप कायम राहणार आहे. जिल्ह्यात १०० गावे कोरोनामुक्त असून, सरासरी २०० विद्यार्थी धरले तर या वर्गातील विद्यार्थ्यांची २० ते २५ हजारांच्या घरात जाते.
कोरोना संसर्गामुळे गेली वर्षभर शाळा उघडलेल्याच नाहीत. निदान या जूनपासून सुरू होतील असे म्हटले जात होते, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेल्या कहरामुळे सर्व जनजीवनच ठप्प झाल्याने शाळाही बंदच राहिल्या. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग कमी होईल तशा शाळा सुरू होतील, असे नियोजन सुरू होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जी गावे शंभर टक्के कोरोनामुक्त झाली आहेत, त्याची माहिती संकलित करून योग्य उपाययोजनेसह पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरवावे, असे आदेश मागील पंधरवड्यात खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले होते.
त्याप्रमाणे गावनिहाय माहिती संकलनाचे काम सुरू झाले. काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरूही झाल्या, पण कोल्हापूर हा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत राज्यात आघाडीवर असल्याने आणि लॉकडाऊन निर्बंधाच्या चौथ्या टप्प्यातच राहिल्याने शाळा सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जिल्ह्यातील शिक्षण विभागानेही याची फारशी तयारीदेखील केलेली नाही. यासंदर्भात कोरोनामुक्त गावांमध्ये किती शाळा येतील, विद्यार्थी संख्या काय असेल, याबाबतीतही अद्याप माहिती संकलित केलेली नाही.
चौकट
जिल्ह्यात आजच्या घडीला १०२७ गावांपैकी १०० गावे बऱ्यापैकी कोराेनामुक्त झाली आहेत. तेथे बऱ्याच दिवसांपासून एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे येथील शाळा सुरू होतील असे नियोजन सुरू होते, पण राज्याचे फेरआदेश आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाची अनास्था यामुळे या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले असून, मुले पुन्हा एकदा ऑनलाइन शिक्षणात रमली आहेत.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण गावे : १०२७
बॉक्स
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे : १००
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण शाळा २ हजार ३६९
जिल्हा परिषद शाळा १९७७
अनुदानित ११८
विनाअनुदानित ३०
स्वयंअर्थसहाय्यीत २४४
चौकट
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
वर्ग मुले मुली
पाचवी ३१५१७ २६३२४
सहावी ३१४९८ २५८९७
सातवी ३२२२९ २६०९१
आठवी ३२३५७ २६४४३
एकूण ३७१३५१ ३१३६४४
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
आजरा: १६
भुदरगड: २९
चंदगड: ०२
गडहिंग्लज: ०५
गगनबावडा: १६
कागल: ०३
करवीर: ०४
पन्हाळा: ११
राधानगरी: ०२
शाहूवाडी: १२