स्टार ८८१: पेट्रोल, डिझेलच्या दराने किचनचाही भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:22+5:302021-07-07T04:31:22+5:30

कोल्हापूर: पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या दरवाढीची सर्वाधिक झळ स्वयंपाकघराला बसली असून किचन बजेटच्या अक्षरश: चिंध्या उडाल्या आहेत. आधीच ...

Star 881: Petrol, diesel rates hit the kitchen | स्टार ८८१: पेट्रोल, डिझेलच्या दराने किचनचाही भडका

स्टार ८८१: पेट्रोल, डिझेलच्या दराने किचनचाही भडका

Next

कोल्हापूर: पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या दरवाढीची सर्वाधिक झळ स्वयंपाकघराला बसली असून किचन बजेटच्या अक्षरश: चिंध्या उडाल्या आहेत. आधीच लॉकडाऊन, कोरोनामुळे रोजगार गेला आहे, हातात पैसा उरलेला नाही, जी काही जमापूंजी आहे त्यावर दिवस ढकलायचे म्हटले तरी चौकोनी कुटुंब गृहित धरले तरी किराणा, भाजीपाल्यासाठी आठवड्याला दोन हजारदेखील पुरत नाहीत, अशी परिस्थिती आहे. मेथीची एक जुडी घ्यायची म्हटली तरी २० ते २५ रुपये मोजावे लागत असल्याने स्वयंपाकघराचा खर्च पेलवण्याच्या पुढे गेला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा थेट नसला तरी अप्रत्यक्ष परिणाम स्वयंपाकघरावर होतो. कारण इंधन वाढले की वाहतुकीचे दर वाढतात. ते वाढली की त्याचा माल ने-आणीवर आपसूकच परिणाम होतो. आताही लॉकडाऊनमुळे एका बाजूला घरात बसावे लागत असतानाच वाढलेल्या मालवाहतुकीमुळे जीवनाश्यक वस्तूच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. व्यापारी वर्गाकडून साठेबाजी करून कृत्रिम दरवाढ केली जात असल्याची चर्चा असली तरीदेखील एकूण साबणापासून ते पालेभाज्यापर्यंत सर्वच महागले असून गृहिणींना स्वयंपाकघर सांभाळणे अवघड झाले आहे.

असे वाढले पेट्रोल डिझेलचे दर

महिना पेट्रोल डिझेल

जानेवारी २०१८: ७८.५६ ६३.१२

जानेवारी २०१९ : ७५.०२ ६५.४४

जानेवारी २०२०: ८०.९१ ६८.७६

जानेवारी २०२१: ९३.३४ ८२.५४

फेब्रुवारी : ९३.१४ ८२.३८

मार्च : ९८.७१ ८९.७४

एप्रिल : ९७.६७ ८७.३२

मे : ९८.३९ ८९.४६

जून : १०१.६३ ९२.१७

जुलै : १०६.८७ ९८.२१

डाळींची फोडणीही महागली

१ डाळींचे दर सध्या स्थिर असलेतरी गेल्या दोन महिन्यांत दरात प्रचंड वाढ झाल्याने डाळी, कडधान्ये विकत घेणेही आता आवाक्याबाहेर आहे.

२ खाद्यतेलाचे दर किलोमागे २० ते २५ रुपयांनी कमी झाले असून डब्यामागे १५० ते २५० रुपयांची घट झाली आहे.

३ तूर, मूग डाळ अजूनही ११० ते १२० च्या घरात आहे. मसूर डाळही ९० रुपयांच्या घरात आहे.

डाळी कडधान्याचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ १२०

मूगडाळ ११०

मसूरडाळ ९०

मसुरा ८५

मूग १००

चवळी ९०

वाटाणा १००

ज्वारी ३५ ते ६०

गहू २० ते ३६

वांगी १०० रुपये किलो

फळभाज्यामध्ये वांग्यांना सर्वाधिक मागणी असते, पण वांगी ८० ते १०० किलो झाल्याने ग्राहक हात अखडत आहेत.

मेथी एक जुडी २० रुपये

भाजीपाल्याचे दर

भाजी दर (प्रतिकिलो)

भेंडी ६०

दोडका ८०

बिन्स १००

वरणा ८०

कारली ६०

कोबी ४०

फ्लॉवर ५०

हिरवी मिरची ६०

टोमॅटो ३०

आले १००

ट्रॅक्टरची शेतीही महागली

आता मशागतीची कामे बऱ्यापैकी थांबली असलीतरी मागील महिन्यात झालेल्या मशागतींची बिले किमान २० टक्क्यांनी वाढवून आल्याने शेतीच्या बजेटवरही ताण आला आहे. नांगरटीपासून ते रोटर, सरीपर्यंतच्या सर्वच कामात एकरी हजार ते दोन हजारांनी वाढ झाली आहे. डिझेलचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत लिटरमागे ४० रुपयांनी वाढल्याने ट्रॅक्टर चालवणे परवडत नसल्याचे ट्रॅक्टरचालकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबाला घरातील कोलमडलेले बजेट सावरतानाच आता शेतीचे बजेट सावरण्यासाठी मोठ्या आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.

गॅसही आवाक्याबाहेर

डिसेंबरमध्ये ५९७ रुपये असणारा घरगुती गॅस जानेवारीत एकदम १०० ने वाढून ६९७ वर गेला. त्यानंतर तो वाढतच गेला आता तोच दर ८३४ रुपये झाला आहे. त्यात आणखी वाहतूक खर्च २० ते ३० रुपया धरला तर ८५० रुपये एका टाकीसाठी मोजावे लागत आहेत. आधीच डाळी, कडधान्ये, भाजीपाला महागल्याने स्वयंपाकघराचे गणित सावरता सावरता नाकी नऊ येत असताना त्यांना गॅसने आणखी भर टाकल्याने शिजवायचे कशावर, असा प्रश्न गृहिणी विचारू लागल्या आहेत.

प्रतिक्रिया

घर चालवणे झाले कठीण

लॉकडाऊनमुळे पतीच्या पगारात कपात झाली. खर्च तरी वाढतच चालले आहेत. तरीदेखील काटकसरीने संसार चालवला आहे, पण भाजीपाला, कडधान्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे स्वयंपाक नेमका काय आणि कसा करायचा याची रोजच चिंता असते. हातात पडणाऱ्या पैशापेक्षा खर्च जास्त होत असल्याने किरकोळ खर्चासाठीदेखील कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

(माधवी खेडकर, मोरेवाडी, गृहिणी)

कडधान्य, डाळींचे दर मागील दोन-तीन महिन्यांपासूनच वाढलेले आहेत. आता नवीन कोणती वाढ नाही, किरकोळ स्वरूपात दर उतरत आहेत, पण दरवाढीमुळे ग्राहकांकडून मागणी कमी झाल्याने त्याचा धंद्यावर परिणाम झाला आहे.

संजय नाकील, कडधान्य व्यापारी, सांगरुळ

Web Title: Star 881: Petrol, diesel rates hit the kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.