स्टार ८८२.. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:14+5:302021-07-07T04:29:14+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पावसाच्या नक्षत्रातच दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उन्हाच्या तडाख्याने अंगातून ...

Star 882 .. Tell me, Bholanath, will it rain? | स्टार ८८२.. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय

स्टार ८८२.. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय

Next

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पावसाच्या नक्षत्रातच दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उन्हाच्या तडाख्याने अंगातून घामाच्या धारा निघत असून, पिके पिवळी पडून कोमेजू लागली आहेत. आणखी तीन-चार दिवस पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवणार, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असतो. या कालावधीतच भात, ज्वारी, भुईमूग, नागली या पिकांची वाढ जोमात होते. ‘मृग’ नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्यानंतर गेले पंधरा दिवस पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे पिके ढगाकडे बघू लागल्याने आता पिकांना पाण्याची खरी गरज आहे. सोमवारी नक्षत्र बदलल्याने पाऊस सुरू होईल, असे वाटत होते. मात्र, उन्हाचा तडाखा वाढतच गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाऊस, पण..

गेल्या वर्षी ४ जुलैअखेर जिल्ह्यात सरासरी ३४० मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी ४०३ मिलिमीटर झाला आहे. म्हणजेच तुलनेत ६३ मिलिमीटर पाऊस जादा होऊनही यंदा पिके धोक्यात आली आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी असला तरी तो सतत राहिला. यंदा मात्र पाच दिवस जोरदार कोसळला आणि त्यानंतर दडी मारली.

जिल्ह्याची वार्षिक सरासरी - १८२८ मिलिमीटर

प्रत्यक्ष झालेला पाऊस - ४०३ मिलिमीटर

आतापर्यंत झालेली पेरणी - १ लाख २५ हजार ५१८ हेक्टर (७१ टक्के)

तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा

तालुका आतापर्यंतचा पाऊस सरासरी पाऊस

हातकणंगले २३१ ५६७

शिरोळ २२७ ४८८

पन्हाळा ३५३ १७३९

शाहूवाडी ४९७ १९३०

राधानगरी ५१३ २०८७

गगनबावडा ११४० ५२३५

करवीर २९२ १२१५

कागल ३५९ १३४६

गडहिंग्लज ४०९ १०३१

भुदरगड ४१४ १५९२

आजरा ५११ २३७७

चंदगड ५९० २३

कडकडीत ऊन घेऊनच ‘तरणा’ची एंट्री

मान्सूनमध्ये ‘पुनर्वसु’ नक्षत्रात हमखास पाऊस असतो. या काळात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा’ पाऊस म्हणतात. सोमवारी सूर्याने ‘पुनर्वसु’ नक्षत्रात प्रवेश केल्याने पाऊस सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, कडकडीत ऊन घेऊनच ‘तरणा’ची एंट्री झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोट-

गेले दहा-बारा दिवस पावसाचा थेंब नसल्याने डोंगरमाथ्यावरील भात, ज्वारी, भुईमूग पिके करपू लागली आहेत. ऐनवेळी पावसाने दडी मारल्याने पिके जगवायची तरी कशी, असा प्रश्न आहे.

- बाजीराव भोसले (शेतकरी)

पावसाअभावी माळरानावरील पिके करपू लागली आहेत. भाताची रोप लावण पाण्याअभावी थांबली असून, सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे आता पावसाची गरज आहे.

-सुधीर कानडे (शेतकरी, दुंडगे, गडहिंग्लज)

जिल्ह्यात पावसाने ओढ धरली आहे, त्यात शेती पंप बंद असल्याने पिके अडचणीत आली आहेत. आणखी पाच-सहा दिवस पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

- ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)

Web Title: Star 882 .. Tell me, Bholanath, will it rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.