स्टार ९२८- शिक्षकांनी शिकवायचं का खिचडीची बारदानं गोळा करायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:52+5:302021-07-21T04:16:52+5:30

कोल्हापूर ‘जिथं कमी, तिथं प्राथमिक शिक्षक’ असे गेली अनेक वर्षे शासनाचे धाेरण असल्यामुळे शिक्षकांना ...

Star 928- Why do teachers want to teach? | स्टार ९२८- शिक्षकांनी शिकवायचं का खिचडीची बारदानं गोळा करायची

स्टार ९२८- शिक्षकांनी शिकवायचं का खिचडीची बारदानं गोळा करायची

Next

कोल्हापूर ‘जिथं कमी, तिथं प्राथमिक शिक्षक’ असे गेली अनेक वर्षे शासनाचे धाेरण असल्यामुळे शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त अनेक कामांमध्ये गुंतवण्यामध्ये प्रशासन धन्यता मानत आहे. जवळपास २१ अशैक्षणिक कामे शिक्षकांना लावली जात असल्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. याआधीही अनेक शासन आदेश निघूनही शिक्षकांची कामे कमी होत नसल्याने अनेक पिढ्यांचे नुकसान असेच सुरू राहणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चौकट

शाळा उठाव निधीपासून ते हिशोबापर्यंत

लोकसहभागातून शाळा रंगवण्यापासून संगणकासह अन्य साहित्य संकलन करण्यासाठी देणग्या गोळा करण्यापासून ते त्याचा हिशोब ठेवण्यापर्यंत, किती मुलांनी आहार घेतला इथंपासून ते खिचडीच्या बारदान्यापर्यंतचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे.

चौकट

खालील अशैक्षणिक कामे लावली जात असल्याचा शिक्षकांचा दावा

१ जनगणना

२ मतदार याद्या तयार करणे

३ निवडणूक पार पाडण्याचे प्रत्यक्ष काम करणे

४ पल्स पोलिओ कार्यक्रमात सहभाग घेणे

५ दारिद्र्यरेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे

६ कुटुंब नियोजन कार्यक्रमात भाग घेणे

७ अल्पबचत

८ साक्षरता अभियान

९ सकस आहार वाटप

१० प्रौढ शिक्षण

११पशुगणना करणे

१२ ग्रामस्वच्छता अभियान

१३ वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करणे

१४ प्रवेशपात्र मुलांचे सर्वेक्षण करणे

१५ गळती/स्थगितीचे सर्वेक्षण करणे

१६ प्रवेश दिंडी काढणे

१७ आरोग्य तपासणी विद्यार्थ्यांची कार्डे भरून देणे

१८ शाळा सोडल्याचे दाखले लिहिणे

१९ प्रवेश फॉर्म जनरल रजिस्टरमध्ये नोंद करणे

२० वैद्यकीय देयके व प्रवासाची देयके सादर करणे

२१ विद्यार्थ्यांना वाटलेल्या साहित्याची वाटपपत्रके बनवणे

चौकट

एकशिक्षक शाळांचे दुखणे वेगळे

काही ठिकाणी एकशिक्षक शाळा कार्यरत आहेत. या ठिकाणचे दुखणे वेगळेच आहे. येथे शिकविण्यापासून ते माहिती भरण्यापर्यंत सर्व कामे एकाच शिक्षकाला करावी लागतात. ज्यावेळी तालुक्याला जायचे असेल किंवा केंद्र शाळेत जायचे असेल तेव्हा शाळा बंद करूनच त्यांना जावे लागते.

चौकट

ऑनलाईन माहिती भरण्याची जबाबदारी एकावर

अनेक शाळांमध्ये सर्व प्रकारची ऑनलाईन माहिती भरण्याची जबाबदारी त्यातल्या त्यात तरुण आणि त्यातील माहिती असणाऱ्या शिक्षकाकडे दिली जाते. मग त्याच्या वर्गावरील तास घेण्यापासून ते अन्य जबाबदारी अन्य शिक्षक पार पाडतात; परंतु सर्व माहितीची जबाबदारी एकावरच दिली जाते.

कोट

पूर्वी शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्यासाठी तालुका शाळेला वारंवार जावे लागत होते. आता हीच माहिती ऑनलाइंन भरण्यामध्ये शिक्षकांचा वेळ जात आहे. पोषण आहाराच्या बारदान्यापासून ते विविध सर्वेक्षणापर्यंत अनेक कामे प्राथमिक शिक्षकांना लावली जात असल्यामुळे साहजिकच याचा परिणाम अध्यापनाच्या गुणवत्तेवर होत आहे.

संभाजी बापट

जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

कोट

शिक्षकांकडे केवळ अध्यापन एवढे एकच काम दिले पाहिजे. शासनमान्य खासगी शाळांमध्ये लिपिक आणि शिपाई ही पदे आहेत; परंतु शाळेत असे एकही पद नाही. त्यामुळे लिपिकाचे आणि शिपायाचे काम शिक्षकालाच करावे लागते. घंटा देण्यापासून ते सर्व प्रकारची ऑनलाईन माहिती भरण्यापर्यंत सर्वच कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

प्रसाद पाटील

अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पुरोगामी शिक्षक समिती

कोट

केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसारच प्राथमिक शिक्षकांवर जबाबदाऱ्या दिल्या जातात. विविध कामांबाबत शिक्षकांनी आक्षेप घेतले आहेत. त्या त्यावेळी त्यांच्या मागण्या शासनाकडे केल्या जातात. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांवर काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे.

आशा उबाळे

प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

Web Title: Star 928- Why do teachers want to teach?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.