स्टार ९४३ वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:45+5:302021-07-20T04:17:45+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलाच्या भक्तांना घरीच आषाढी करावी लागत आहे. वारकऱ्यांसह ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलाच्या भक्तांना घरीच आषाढी करावी लागत आहे. वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ लागली असून, आषाढी यात्रा रद्द झाल्याने एस.टी. महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. प्रत्येक वर्षी आषाढीनिमित्त एस.टी.च्या पंढरपूरसाठी २५० फेऱ्या व्हायच्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकोबारायांच्या शेकडो वर्षांचा पालखी सोहळा कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाल्याने वारकऱ्यांंच्या मनात हुरहुर आहे. आषाढी वारी सुरू झाल्यानंतर उठता, बसता विठुमाउलीच्या ओढीने मन कासावीस होणाऱ्या वारकऱ्यांना आज, आषाढी एकादशीला घरातूनच विठ्ठलाचा धावा करावा लागणार आहे. विठ्ठलाच्या भक्तांमध्ये अस्वस्थता आहे. दरवर्षी एस.टी.तून हजारो भाविक पंढरपूरला जातात. त्यातून एस.टी. ला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. साधारणत: दरवर्षी आषाढीनिमित्त एस.टी.च्या २५० हून अधिक फेऱ्या होतात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे वारी बरोबर आषाढी यात्रा रद्द झाल्याने एस.टी.चे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोल्हापुरातून २५० दिंड्या आणि १५ हजार वारकरी
कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी पंढरपूरच्या वारीसाठी सुमारे २५० हून अधिक दिंड्या जातात. यामध्ये जवळपास १५ हजार वारकरी दिंड्यांमध्ये सहभागी होतात. त्याशिवाय मध्यंतरी जाऊन दिंडीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वेगळीच आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या निम्मी असते. करवीर, राधानगरी, भुदरगड, कोल्हापूर शहर, आजरा व चंदगड तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात दिंड्या जातात.
कोट-
आषाढी वारीची ओढ वर्षभर लागलेली असते. कधी जाऊन विठ्ठलाची भेट घेऊ असे आम्हा वारकऱ्यांना वाटत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने माऊलीची आणि आमची ताटातूट केल्याने जीव कासावीस झाला आहे. माऊली लवकर हे संकट घालवून सोहळ्यातून भेटीसाठी बोलवेल.
- राहुल विलास खाडे (वारकरी, सांगरूळ)
आषाढी यात्रेनिमित्त कोल्हापूर आगारातून दरवर्षी २५० हून अधिक बसेस जात होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून यात्रा बंद असल्याने या बसेस बंद आहेत.
- राेहन पलंगे (विभागीय व्यवस्थापक, एस.टी.)
दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या बसेस - २५०
बसमधून जाणारे प्रवासी - १३५००
मिळणारे उत्पन्न - सुमारे ३० लाख