स्टार ९४६ : उपचार करणारेच दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:50+5:302021-07-21T04:16:50+5:30
कोल्हापूर : कोविड लसीकरणासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच उपचार करणाऱ्या हेल्थ वर्कर्सनाही तिष्ठत राहण्याची वेळ आली आहे. पहिला डोस शंभर टक्के पूर्ण ...
कोल्हापूर : कोविड लसीकरणासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच उपचार करणाऱ्या हेल्थ वर्कर्सनाही तिष्ठत राहण्याची वेळ आली आहे. पहिला डोस शंभर टक्के पूर्ण झाला असला तरी दुसऱ्या डोससाठी मात्र यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पहिला डोस ११६ टक्के झाला असताना दुसरा डोस केवळ ६४ टक्के जणांनीच घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधक म्हणून लस उपलब्ध झाल्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच जानेवारीपासून जिल्ह्यात हेल्थ वर्कर्स व फ्रंटलाइन वर्कर्सना प्राधान्याने लस दिली जात आहे. हे कोविडकाळात आघाडीवर असल्याने त्यांच्या जीवाला कोणताही धोका नको हा त्यामागचा उद्देश. त्यानंतर लस उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढेल, तसे ४५ वयोगटातील, ६० वर्षांवरील असे विविध टप्पे पाडून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला. तथापि, जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठाच होत नसल्याने लसीकरण मोहीम अजूनही केवळ १७ टक्क्यांच्याच घरात आहे. जिल्ह्यात ३१ लाख ९४ हजार ९९४ लसीकरणाचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी आतापर्यंत ६ लाख ७० हजार जणांनीच लस घेतली आहे, त्यातही पहिला डोस ३२ टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ १७ टक्के आहे. अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचा बाकी आहे.
१) एकूण हेल्थ केअर वर्कर्स : ३८ हजार २५६
पहिला डोस घेणारे : ४४ हजार १९४ (११६ टक्के)
दोन्ही डोस घेणारे : २४ हजार ३३० (६४ टक्के)
फ्रंटलाइन वर्कर्स : २९ हजार ८२१
पहिला डोस घेणारे : ८४ हजार ६८२ (२८४ टक्के)
दोन्ही डोस घेणारे : ३४ हजार ४८९ (११६ टक्के )
२) लसीकरण कमी का
प्राधान्याने हेल्थ वर्कर्स व फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्याचे धोरण असताना ते दुसऱ्या डोसपासून वंचित राहण्यामागे दोन लसीकरणांतील वाढवलेले अंतर हेदेखील एक कारण आहे. आधी २८, नंतर ४२ आणि ८४ दिवसांचा कालावधी त्यासाठी दिल्याने ही टक्केवारी कमी होत असल्याचे दिसत आहे.
३) फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण उद्दिष्टाच्या अडीच पटीने पूर्ण
जिल्ह्यात फ्रंटलाइन वर्कर्सचे संख्येनुसार २९ हजार ८२१ असे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात ८४ हजार ६८२ जणांचे लसीकरण झाले आहे. २८४ टक्के इतके विक्रमी लसीकरण झाले आहे. यांच्यातही ३४ हजार ४८९ जणांनी म्हणजेच ११६ टक्के लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे. एकूण लसीकरणाच्या उद्दिष्टापैकी अडीच पटीने जास्त लसीकरण झाले आहे.
प्रतिक्रिया
लसीकरणात प्राधान्याने हेल्थ वर्कर्सना प्राधान्य देण्याचे धोरण आहे, त्याप्रमाणे अंमलबजावणीदेखील होत आहे. अजूनही १० हजारांवर हेल्थ वर्कर्सचा दुसरा डोस झालेला नाही. दोन लसीकरणातील अंतर वाढवल्याने ही तफावत दिसत आहे, ती लवकरच दूर होईल.
- डॉ. एफ. ए. देसाई (लस नियंत्रण अधिकारी)