(स्टार ९४७)‘केवायसी’साठी फोन आल्यास सावधान...! बँकेतील खाते रिकामे होऊ शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:44+5:302021-07-21T04:16:44+5:30
कोल्हापूर : ‘आपल्या बँक खात्याची केवायसी अपडेट झालेली नाही, तत्काळ ऑनलाईन अपडेट करून घ्या, अन्यथा आपले बँक खाते लवकरच ...
कोल्हापूर : ‘आपल्या बँक खात्याची केवायसी अपडेट झालेली नाही, तत्काळ ऑनलाईन अपडेट करून घ्या, अन्यथा आपले बँक खाते लवकरच करप्ट होईल’ असा आपल्याला मोबाईलवर फोन आल्यास सावधान...! केवायसी अपडेटबाबत मोबाईलवर एक लिंक येते. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीच्या मोहात पडून सांगेल तसे केल्यास तुमच्या बँक खात्यातील सर्वच रक्कम काही सेकंदातच गायब होते. सायबर सेल तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये वर्षभरात ऑनलाईन फसवणुकीच्या ९७९ तक्रारी दाखल झाल्या, त्यापैकी ‘केवायसी’च्या नावाखाली फसवणुकीबाबत सुमारे १५० हून अधिक तक्रारी आहेत. तत्परतेने पोलिसांची मदत घेतलेल्यांना काहीअंशी रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे, पण असे प्रमाण फक्त दोन टक्केच आहे.
सध्या बँकेतील व्यवहारासाठी ऑनलाईनचा वापर वाढला. हॅकर्स परिस्थितीनुसार माणसाच्या गरजा पुढे करत संबंधित व्यक्तीला बोलण्याच्या मोहात पाडतात, त्याला प्रतिसाद दिल्यास फसवणूक होते. सध्या हॅकर्सनी बँकेच्या ‘केवायसी’चा विषय पुढे करत अनेकांची बँक खाती रिकामी केली. हॅकर्सकडून पाठवलेली लिंक भरुन पाठवल्यास क्षणातच तुमच्या बँक अकौंटची गोपनीय माहिती हॅकर्सला कळून ते तुमच्या खात्यातील सर्वच रक्कम परस्पर काढतात.
नेमकी फसवणूक कशी होऊ शकते...
१) फोन येतो, ‘बँक केवायसी अपडेट करा, अन्यथा तुमचे बँक खाते बंद होणार’. कोरोनामुळे बँकेत गर्दी नको म्हणून ऑनलाईनवरुन आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईलवर स्कॅन करुन पाठवा’ असे सांगितले जाते. पाठोपाठ अकौंट नंबर, एटीएम कार्डच्या मागील सीव्हीही नंबर घेतात. हा नऊ अंकी सांगितल्यास काही क्षणातच खात्यावरुन पैसे गायब होतात.
२) हॅकर्स हे ‘केवायसी’ कागदपत्रे जमा करण्यासाठी मोबाईलवर लिंक पाठवतात. लिंकवर माहिती भरल्यानंतर खातेदाराच्या मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ भूलथापा लावून हॅकर्स मागवून घेतो. तो नंबर सांगितल्यास हॅकर्स त्वरित त्यांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम परस्पर काढतात.
३) खातेदार फोन पे, गुगल पे, पेटीएम असे ऑनलाईन व्यवहारासाठी वापरत असेल तर त्याला ‘केवायसी’चे निमित्त पुढे करुन खाते नोंदणीकृत करताना दिलेला सीव्हीव्ही नंबर शेअर करण्यास भाग पाडतात. एटीएम सुरु ठेवण्यासाठी तो नंबर आवश्यक असल्याचेही सांगतात. तो नंबर मिळताच हॅकर्स खात्यावरील पैसे त्वरित काढतात.
तत्परता जितकी, तितके पैसे परत मिळण्याची संधी
हॅकर्सकडून बँकेतील खाते रिकामे होऊन फसवणूक झालेल्याने त्वरित सायबर क्राईमशी संपर्क साधल्यास ऑनलाईन पैसे ट्रान्सफर झालेले खाते सिस्टीमद्वारे सील करता येते. फसवणूक झालेले पैसे परत मिळण्याची शक्यता असते. जिल्ह्यात फक्त २ टक्के जणांना पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले.
कोट...
‘केवायसी’अपडेटसाठी कोणतीही बँक कधीही ऑनलाईनचा वापर करत नाही. खातेदाराने स्वत: बँकेत जाऊन ‘केवायसी’ची कागदपत्रे जमा करावीत. फोनवर कोणालाही माहिती देऊ नये. - श्रीकृष्ण कंकाल, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम, कोल्हापूर.