ताराराणी आघाडीला एक चिन्ह मिळणारचं
By admin | Published: October 9, 2015 12:21 AM2015-10-09T00:21:04+5:302015-10-09T00:42:16+5:30
सुनील मोदी : विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे काम
कोल्हापूर : ताराराणी आघाडी पक्षाला एक चिन्ह मिळणारच नाही, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. परंतु, यामध्ये तथ्य नसून ‘ताराराणी’ हा नोंदणीकृत पक्ष असल्याने एक चिन्ह मिळणारचं आहे, असे स्पष्टीकरण ताराराणी आघाडी पक्षाचे निमंत्रक सुनील मोदी यांनी गुुरुवारी पत्रकार परिषदेत केले. १७ आॅक्टोबरला चिन्ह वाटपादिवशी हे एकच चिन्ह मिळेल. मात्र, ते कोणते हे आताच सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी म्हणाले, ताराराणी आघाडी पक्षाची २००९ मध्ये नोंदणी झाली असून, हा एक नोंदणीकृत पक्ष आहे. राज्यात २२८ नोंदणीकृत पक्ष असून, त्यामधील ‘ताराराणी’ हा एक आहे. त्यामुळे नोंदणीकृत पक्षाला जे नियम लागू आहेत, ते सर्व नियम या पक्षालाही लागू आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यानंतर पक्षांना चिन्हे वाटण्याचे काही प्रमाण आहे. यामध्ये प्राधान्याने राष्ट्रीय पक्षांचे आरक्षित चिन्ह आहे ते त्यांना द्यावयाचे आहे. त्यानंतर जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना जे आरक्षित चिन्ह आहे, ते त्यांना द्यावयाचे आहे. त्यानंतर नोंदणीकृत पक्षाला चिन्ह द्यावयाचे आहे.
मोदी पुढे म्हणाले, नोंदणीकृत पक्षांना कोणतेही चिन्ह आरक्षित ठेवण्याची तरतूद नाही. ते ज्या-त्या निवडणुकीवेळी घ्यावे लागते. त्यामुळे चिन्हे वाटपादिवशीच एक चिन्ह मिळणार आहे. आम्ही दोन महिन्यांपूर्वी पक्षाला एक चिन्ह द्यावे, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु, ती न मिळाल्याने उच्च न्यायालयात गेलो होतो. त्यानुसार तेथे आता लगेच एक चिन्ह देणे शक्य नाही. परंतु, चिन्ह वाटपादिवशी तुम्हाला एक चिन्ह मिळू शकते, असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी एकच चिन्ह मागण्यामागे उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सोयीचे झाले असते, असा हेतू होता. विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू असून त्यामध्ये तथ्य नाही. (प्रतिनिधी)
३८ जागांवर ‘ताराराणी’चे एकच चिन्ह
ताराराणी आघाडी हा स्वतंत्र पक्ष असून, भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या पक्षाला स्वतंत्रपणे एक चिन्ह मिळेल, असे सांगून मोदी यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला. त्यामध्ये भाजप ३८, ताराराणी आघाडी ३८, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) २ अशा जागांचा फॉर्म्युला ठरला आहे.