पोलिसांसाठी १४00 घरांच्या प्रकल्पाचा जानेवारीत प्रारंभ

By admin | Published: November 8, 2016 01:11 AM2016-11-08T01:11:51+5:302016-11-08T01:32:00+5:30

चार मजली भव्य इमारत साकारणार : लक्ष्मीपुरी, बुधवार पेठ पोलिस वसाहतींत नवा प्रकल्प

Start of 1400 housing projects for police in January | पोलिसांसाठी १४00 घरांच्या प्रकल्पाचा जानेवारीत प्रारंभ

पोलिसांसाठी १४00 घरांच्या प्रकल्पाचा जानेवारीत प्रारंभ

Next

एकनगथ पाटील -- कोल्हापूर --इंग्रजांच्या काळात सुमारे पाच एकरांत लक्ष्मीपुरी व बुधवार पेठ परिसरात पोलिसांना राहण्यासाठी १७० घरे (क्वार्टर्स) बांधण्यात आली आहेत. या घरांची आयुष्यमर्यादा संपली आहे. पहिल्या टप्प्यात लक्ष्मीपुरी व बुधवार पेठ वसाहतीमधील घरे पाडून त्या ठिकाणी ४०० घरांची चारमजली भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ १ जानेवारी २०१७ रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन टप्प्यांत पोलिस मुखालय
परिसरातील घरे पाडून नव्याने १४०० घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
पोलिस वसाहतींना सध्या अवकळा प्राप्त झाली आहे. या वसाहती विविध समस्यांच्या भोवऱ्यात अडकल्याने तेथील घरे सोडून काही पोलिस भाड्याच्या घरांत निघून गेले आहेत. पोलिसांच्या घरांची बिकट अवस्था पाहून गृहखात्याने पोलिसांना नवीन घरे देण्याची घोषणा यापूर्वी केली होती. नवीन घरांचे स्वप्न
उराशी बाळगून संसाराची मोट बांधलेल्या पोलिसांसह कुटुंबीयांचे पडझड झालेल्या छोटेखानी
घरांमध्ये मरणयातना भोगणारे विदारक चित्र सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेत राज्याच्या गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी या घरांची पाहणी केली. त्यानंतर घरांचा नवीन प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला. या प्रस्तावानंतर राज्यात पोलिसांसाठी २९ हजार निवासस्थाने बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामध्ये कोल्हापूरसाठी १४०० निवासस्थाने मंजूर केली.
पहिल्या टप्प्यात लक्ष्मीपुरी व जुना बुधवार पेठ येथील घरे पाडून चार मजली आरसीसी इमारत उभी केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ जानेवारीमध्ये होत आहे. या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबीयांना पोलिस मुख्यालय वसाहतीमध्ये हलविण्यात येणार आहे. काही खासगी घरांमध्ये राहिल्यास त्याचे भाडे शासन देणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शाहूकालीन शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पोलिसांच्या घरांना नवसंजीवनी मिळाली आहे.



कुटुंबीयांची वेदना... अडगळीचा संसार
कौलारू आणि दहा बाय दहाच्या दोन खोल्या असून, यामध्ये स्वयंपाकखोली आणि बैठ्या खोलीसह अंघोळीसाठी छोटेसे बाथरूम अशी या घरांची रचना आहे. विश्रांती घ्यायची म्हटली तरीही हक्काच्या घरातील अडचणींमुळे ते त्यांच्या पदरी पडत नाही. प्रत्येकाच्या घरात पत्नी, मुले, आई-वडील असे मिळून सहा ते सात जणांचे कुटुंब आहे. मुलांना अभ्यास करायला जागा नाही. स्वयंपाकघरातच जेवण करून झोपावे लागते. एखादा पाहुणा आला तर मोठी गोची होते. जागेअभावी राहायची इच्छा असूनही त्यांना राहता येत नसल्याची खंत काही कुटुंबीयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

पोलिसांच्या घरांची अवस्था बिकट आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूरसाठी २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला असून नवीन घरांचा प्रारंभ लक्ष्मीपुरी वसाहतीमधून १ जानेवारी २०१७ रोजी केला जाणार आहे.
- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री


चार खोल्यांचे घर मिळणार
पोलिस मुख्यालय ७१८, लक्ष्मीपुरी पोलिस लाईन ६०, रिसाला पोलिस लाईन - कसबा बावडा ५१, जुना बुधवार पोलिस लाईन ८४ अशी ९१३ घरे उपलब्ध आहेत. पोलिस गृहनिर्माण कल्याण महामंडळातर्फे १४०० घरांना मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात जुना बुधवार पोलिस लाईन २००, लक्ष्मीपुरी २०० अशी ४०० घरे बांधणार आहेत. इचलकरंजीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कलानगर येथील पोलिस खात्याच्या रिकाम्या जागेवर २४२ घरांच्या बांधकामाबाबत कार्यवाही सुरू आहे. नव्या घरात तीन ते चार खोल्यांचे घर मिळणार आहे.


पाच कोटींचा निधी मंजूर
पोलिस मुख्यालय ७१८ व रिसाला पोलिस लाईन-कसबा बावडा ५१ अशा ७६९ घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. मे २०१७ अखेर या घरांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये शौचालये, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, घरांची दुरुस्ती व रंगरंगोटीचा समावेश आहे.

Web Title: Start of 1400 housing projects for police in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.