जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:42 PM2018-08-27T15:42:22+5:302018-08-27T15:46:00+5:30

डोंगररांगांतून वाहणारे धुके, मंद वारा, सोबतीला ऊन-पावसाचा खेळ, हिरव्यागार निसर्गाच्या संगतीत गुलालाची उधळण, तोंडी यमाईदेवी, चोपडाईदेवी, काळभैरव, व जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात सोमवारी जोतिबा डोंगर येथे नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ झाला.

Start of celebrating Nagri Vidyakshina (Dindi) in the Jyotiba Jubilee celebrations | जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ

जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देजोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोषनगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ, दीड लाखाच्यावर भाविकांची हजेरी

जोतिबा : डोंगररांगांतून वाहणारे धुके, मंद वारा, सोबतीला ऊन-पावसाचा खेळ, हिरव्यागार निसर्गाच्या संगतीत गुलालाची उधळण, तोंडी यमाईदेवी, चोपडाईदेवी, काळभैरव, व जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात सोमवारी जोतिबा डोंगर येथे नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ झाला.

वीणा, टाळ, मृदंग, ढोल, सनई, तसेच भजन-कीर्तनाच्या तालात प्रदक्षिणेसाठी दीड लाखाच्यावर भाविकांनी हजेरी लावली. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही नगरप्रदक्षिणा काढली जाते.

जोतिबा डोंगराभोवतालची बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक प्रदक्षिणेत सहभागी होतात. रविवारपासूनच नगरप्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून भाविक दाखल झाले होते.

सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाले. अभिषेक व श्रींच्या अलंकारिक पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता चांगभलंचा अखंड जयघोष झाला, त्यानंतर दिंडी मुख्य मंदिरातूत दक्षिण दरवाजातून गजगतीने मार्गस्थ झाली.

सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाले. त्यानंतर भाविकांनी तेथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. साडेअकरा वाजता दिंडी जोतिबा कोल्हापूर मार्गावरील भीमाशंकरजवळ आली. तेथून ती नंदीवन, आंबावन, पानखंड, नागझरी, मंडोपतीत, व्याघराई तीर्थ, तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी मुरागुळा येथे आली.

मुरागुळात झिम्मा फुगडीने रंगत आणली. काहींनी भजनांचे सूर व जोतिबाची भक्तिगीते गायिली. येथे चहा, केळी, शाबूदाणा, राजिगरा लाडूचे वाटप झाले. दिंडी पुन्हा जमनाचीवाडी (दानेवाडी) सरकाळामार्गे गिरोली (ता. पन्हाळा) येथे आली. तेथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी व आरती झाली. येथेच एक दगडावर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. तेथे भाविकांनी दर्शन घेतले.

.

सहज सेवा ट्रस्टतर्फे खिचडी

सहज सेवा ट्रस्टतर्फे गायमुख तलाव येथे भाविकांना शाबू खिचडी, केळी, चहाचे वाटप केले. तसेच जोतिबा डोंगरावर धसडाचे खळे येथे काही शेतकऱ्यांनी चहा वाटप केले. मुरागुळा, गिरोली येथेही चहा, राजिगरा लाडू, खिचडी, केळीचे वाटप करण्यात आले.

Web Title: Start of celebrating Nagri Vidyakshina (Dindi) in the Jyotiba Jubilee celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.