पंजे प्रतिष्ठापनेला प्रारंभ
By admin | Published: October 28, 2014 12:44 AM2014-10-28T00:44:02+5:302014-10-29T00:12:31+5:30
भाविकांची गर्दी : बाबूजमालचा ‘नाल्या हैदर’ शनिवारी भेटीला
कोल्हापूर : संस्थानकालीन गुरुवार पेठेतील बाबूजमाल तालीम मंडळाचा ‘हजरतपीर नाल्या हैदर कलंदर’ या पीरपंजाची विधीवत पद्धतीने प्रतिष्ठापना झाली. शहरात आज, सोमवारपासून पीरपंजा प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवशी बाबूजमाल येथील पंजाचा नवस फेडण्यासाठी भाविकांची रेलचेल सुरू होती. दरम्यान, उद्या मंगळवारी तिसऱ्या दिवशी बहुतांश: शहरातील पीरपंजाची प्रतिष्ठापना होते.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सणास काल(रविवार)पासून प्रारंभ झाला. आज दुसऱ्या दिवशी शुक्रवार पेठ खोलखंडोबा तालीम येथील सूर्यवंशी बंधू यांचा ‘चाँदसाहेब (वल्ली) यांच्या पंजाची प्रतिष्ठाना रात्री करण्यात आली तसेच अनेक तालीम संस्था व घरगुती पीरपंजे बसविण्याची तयारी सुरू होती. एकंदरीत, शहरात शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्यातील पीरपंजासह दिलबहार, फिरंगाई, बजापराव माजगांवकर,जुना बुधवार तालीम आदी तालीम संस्थांमध्ये प्रतिवर्षी प्रतिष्ठापना होते. या सणानिमित्त बाबूजमाल तालीम मंडळ येथे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या तालीम मंडळाचा ‘हजरतपीर नाल्या हैदर कलंदर’ पीरपंजा शनिवारी (दि.१) रविवारी (दि.२) भेटीस जाणार आहे. तीन नोव्हेंबरला मोहरमचा मुख्य दिवस असून त्या दिवशी रात्री दहा वाजता ‘खत्तलरात्र’ होणार आहे.