ग्रामीण भागातील यात्रांच्या हंगामाला प्रारंभ
By admin | Published: February 21, 2017 11:52 PM2017-02-21T23:52:12+5:302017-02-21T23:52:12+5:30
मोठी आर्थिक उलाढाल : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शर्यती, स्पर्धांसह कुस्ती मैदानांचे आयोजन
शिवाजी सावंत -- गारगोटी --ग्रामीण भागाच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या (माही) यात्रा सुरू झाल्या आहेत. अपवादात्मक गावांमध्ये शाकाहारी, तर इतर सर्व गावांमध्ये मांसाहारी जेवणाने साजरा करण्यात येतो. या सणाला मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यावर्षी झालेल्या नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या मंदीनंतर येणारा हा पहिलाच सण, उत्सव असल्याने नागरिकांइतकीच प्रतीक्षा व्यापारी, व्यावसायिकांनाही लागली आहे.
माही यात्रा म्हणजे भक्ती, भावना, ग्रामीण पाहुणचार व आहेर, माहेर यांचा अनोखा संगम. गेल्या काही दिवसांत काळवंडलेल्या ग्रामीण नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. तालुक्यात म्हसवे गावाच्या यात्रेने या सणाला सुरुवात होते. त्यानंतर मडिलगे, कोनवडे, भुदरगड किल्ल्यावरील भैरी देवाची, निष्णप येथील लक्ष्मी देवीची, शेणगाव येथील जोतिबाची यात्रा, पळशिवणे, टिक्केवाडी या तालुक्यातील प्रमुख मोठ्या माही यात्रा असून, प्रत्येक गावातील ग्रामदेवतांच्या वेगवेगळ्या माह्या असतात. देवदेवता वेगवेगळ्या असल्या तरी यात्रांचे स्वरूप साचेबद्ध असते. पहिला दिवस जागर, यादिवशी देवदर्शन, देवाचे नवस पुरे करणे, दुसऱ्या दिवशी गोडी यात्रा म्हणजे चिरमुरे गोळ्याची यात्रा, यादिवशी देवांना गोडा पुरण-पोळीचा नैवद्य पोहोच केला जातो. देवळासमोर पूजासाहित्य, मिठाई, खेळणी, दुकाने मांडली जातात. या दिवशी गावातील सर्व लोक आवर्जून देवदर्शन घेतात. जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी यादिवशी देवदर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो, आणि तिसऱ्या दिवशी खारी माहीचा दिवस. या दिवशी पाहुणे, मित्रमंडळींना आमंत्रित केले जाते. असे सर्वसाधारण यात्रेचे स्वरूप असते.
वर्षभर शेत-शिवारात राबलेल्या जिवांच्या श्रमपरिहाराचे कारण ठरणाऱ्या या यात्रा म्हणजे निरागस जीवनाचे प्रतिबिंब असतात. पूर्र्वीच्या काळी बैलगाडीतून यात्रेला जाणे ही एक वेगळीच अनुभूती देणारा होता. काळानुसार बदलत जात असलेल्या ग्रामीण भागातील जीवनशैलीत माणसे आजही तितक्याच उत्साहाने हा सण साजरा करण्यासाठी एकत्र जमतात. नोकरीच्या निमित्ताने परगावी असलेल्यांना गावाकडे येण्याची एक अनामिक ओढ यानिमित्ताने असते. एरव्ही नीरव शांततेत जगणारी खेडी या सणाला अवखळ होऊन जातात. संपूर्ण वातावरणात एक प्रकारचा मोद भरलेला असतो. लहान मुलांना खेळण्याची दुकाने पाहताना एक वेगळीच मजा येत असते. त्यांनी खेळण्यासाठी मोठ्यांकडे धरलेला हट्ट. गल्लीबोळातून फिरणारे आईस्क्रीम विके्रते या बालसुलभ मनावर एक वेगळी फुंकर मारून जातात. माही जवळ आली आहे म्हटले की सुट्टीची जुळणी केली जाते. माहीला यायलाच लागतं, अशी एक रूढी पडलेली दिसून येते. इतर सणाला खेडेगावात जत्रेचे स्वरूप नसते, पण या माही सणाला मात्र ते पहावयास मिळते.
रुढी परंपरा आजही कायम
बैलगाडी शर्यर्ती, तमाशा यासारख्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. गावगणना बैलगाडी शर्यती ही तर ठरलेली शर्यत असते.
या स्पर्धेची गंमत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बैल औतासाठी गेलेले असतात त्या त्या ठिकाणी हे बैल शर्यतीच्या वेळी घुसतात. यातून एक वेगळीच मजा येते.
ग्रामीण भागातील सण आजही तितक्याच भावनिकतेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. काळाबरोबर खेडी बदलली आहेत, तरी
रूढी परंपरा कायम जपली आहे.