मजुरांच्या जेवणासाठी प्रत्येक तालुक्यात कम्युनिटी किचन सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 06:10 PM2020-04-15T18:10:39+5:302020-04-15T18:12:26+5:30
साहजिकच अडकलेले बेघर, मजूर व कामगार यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. निवारागृहात येणा-या वाढीव मजुरांना सोयी-सुविधा मिळण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. सर्व ठिकाणी जेवणाच्या सोयीकरिता खासगी केटरर नेमावेत.
कोल्हापूर : राज्यातील तसेच परराज्यांतील मजूर संचारबंदी कालावधीत संबंधित गावात अडकून पडले आहेत. त्यांची स्वत:ची राहण्याची सोय आहे; परंतु जेवणाची नाही. अशा मजुरांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान तीन नव्याने कम्युनिटी किचन सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत.
राज्यातील आणि परराज्यांतील कामगारांसाठी जिल्ह्यातील २२ ठिकाणी निवारागृहे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत. यांपैकी १४ निवारागृहांमध्ये राज्यातील १६२ आणि परराज्यांतील ६०६ अशा एकूण ७६८ जणांची निवाऱ्याबरोबरच नाष्टा, चहा, जेवण यांची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, दि. ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे.
साहजिकच अडकलेले बेघर, मजूर व कामगार यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. निवारागृहात येणा-या वाढीव मजुरांना सोयी-सुविधा मिळण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. सर्व ठिकाणी जेवणाच्या सोयीकरिता खासगी केटरर नेमावेत. वाढीव अन्न-पाणी लागणार आहे याची कल्पना त्यांना द्यावी.
प्रत्येक तालुक्यात किमान तीन ठिकाणी कम्युनिटी किचनची सोय करावी. काही मजूर हे संबंधित गावामध्ये अडकून पडले आहेत. त्यांची स्वत:ची राहण्याची सोय आहे; मात्र जेवणाची सोय नाही. अशा मजुरांना कम्युनिटी किचनद्वारे जेवण देण्याची व्यवस्था करावी.
सूचनांचे पालन करावे
मजुरांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी. सर्व व्यवस्था करताना सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, मास्क, आदीबाबत उपाययोजना कराव्यात. राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे या पत्रात म्हटले आहे.