‘अभियांत्रिकी’च्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
By Admin | Published: June 5, 2015 11:50 PM2015-06-05T23:50:45+5:302015-06-06T00:55:10+5:30
पहिल्या दिवशी ३०० माहितीपुस्तिकांची विक्री
कोल्हापूर : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. शहरातील तीन अर्ज स्वीकृती केंद्रांतून (एआरसी) पहिल्या दिवशी सुमारे ३०० अर्जांची विक्री झाली. तंत्रशिक्षण संचालनायाकडून (डीटीई) राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या विविध संस्थांमधील १ लाख ५५ हजार ८६७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
शहरातील शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी आणि कदमवाडीतील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, अशी एआरसी सेंटर आहेत. दिवसभरात यातील तंत्रज्ञान विभागातील एआरसीतून शंभर आणि डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून १७५ माहितीपुस्तिकांची विक्री झाली. या पुस्तिकांमध्ये आॅनलाईन अर्ज करण्यासाठीचा अॅप्लिकेशन आयडी देण्यात आला आहे.
एआरसीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)