‘अभियांत्रिकी’च्या परीक्षांना प्रारंभ
By admin | Published: April 24, 2017 07:33 PM2017-04-24T19:33:01+5:302017-04-24T19:33:01+5:30
सुमारे २० हजार पुनर्परीक्षार्थी; शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात ३६ केंद्रे
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ :शिवाजी विद्यापीठाकडून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सोमवारपासून प्रारंभ झाला. त्यात पहिल्या टप्प्यांतर्गत २८ एप्रिलपर्यंत पुनर्रपरीक्षार्थींची परीक्षा होईल. अभियांत्रिकी विद्याशाखेतील मेकॅनिकल, प्रॉडक्शन, सिव्हील, टेलिकम्युनिकेशन अशा विविध १८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा या उन्हाळी सत्रामध्ये होणार आहेत. यातील पहिला टप्पा हा पुनर्परीक्षार्थींचा आहे. हा टप्पा २८ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. यातील परीक्षार्थींची संख्या सुमारे २० हजार इतकी आहे.
एक, तीन, पाच आणि सात या सत्रातील विविध अभ्यासक्रमनिहाय परीक्षा या पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहेत. दुसऱ्या सत्रात दोन, चार, सहा आणि आठ या सत्राअंतर्गत नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. नियमित आणि पुनर्परीक्षार्थी असे एकत्रितपणे सुमारे ८५ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी या उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३६ केंद्रांवरून परीक्षा देणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
विद्यापीठाने प्रश्नपत्रिकांचे वितरण पूर्णपणे गोपनीय व नियंत्रित पद्धतीने (सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी) करण्याची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर सन २०१३ मध्ये औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांपासून केली होती. त्याच्या यशानंतर ती विविध अभ्यासक्रमांना लागू केली. या सत्रात अभियांत्रिकीच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण ‘एसआरपीडी’द्वारे केले जाणार आहे. त्याची सुरुवात सोमवारपासून झाली असल्याची माहिती संचालक काकडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
पहिल्या, सहाव्या सत्रातील परीक्षा संपल्या
बी.ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी. आदी अभ्यासक्रमांच्या पहिल्या आणि सहाव्या सत्रातील परीक्षा संपल्या आहेत. या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम सुरू आहे. साधारणत: दि. १५ मेपर्यंत या परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संचालक काकडे यांनी सांगितले.