आदिशक्तीच्या जागरास उत्साहात प्रारंभ
By admin | Published: October 14, 2015 12:44 AM2015-10-14T00:44:49+5:302015-10-14T00:45:19+5:30
नवरात्रौत्सव : तोफेच्या सलामीने घटस्थापना; आद्यलक्ष्मीच्या रूपात अंबाबाईची पहिली पूजा
कोल्हापूर : विश्वनिर्मिती करणारी आदिशक्ती, भक्तांचा उद्धार आणि दुर्जनांचा नाश करणारी दुर्गा, सर्जनशक्तीची दात्री, धन-धान्य, ऐश्वर्य, समृद्धतेची अधिष्ठाती असलेल्या जगदंबेच्या शारदीय नवरात्रौत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्त साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या देवता करवीरनिवासिनी अंबाबाईची ‘आदिशक्ती आद्यलक्ष्मी’ या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.
नवरात्रौत्सव म्हणजे शक्तीचा जागर. यानिमित्त अंबाबाई मंदिरात पहाटे साडेचार वाजता धार्मिक विधींना प्रारंभ झाला. सकाळी आठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते देवीला शासकीय अभिषेक करण्यात आला. दुपारी बाराच्या आरतीनंतर अंबाबाईची आद्यलक्ष्मीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा विवेक सरमुकद्दम, अरविंद कुलकर्णी व दीपक कुलकर्णी यांनी बांधली.
मंदिरात सकाळी भावेकाका यांचे श्रीसूक्त पठण, त्यानंतर मयूरा जाधव यांचे मंत्रपठण झाले. दिवसभरात गीता मंदिर महिला भजनी मंडळ, स्वरमाउली भजनी मंडळ (करवीर), अंबाबाई भजनी मंडळ (परिते), मनुग्राफ भजन संध्या, मारुती गायन क्लब, मधुबन संगीत मैफल या संस्थांनी मंदिर परिसरात कार्यक्रम सादर केले. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी काढण्यात आली. जिल्हाधिकारी अमित सैनी व पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही देवीला सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर घटस्थापना करण्यात आली. दुपारी १२ वाजता गायकवाड सरकार यांच्यावतीने ‘बकरी तोड’ विधी करण्यात आला. त्यानंतर देवीची बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा महादेव बनकर, बाळकृष्ण दादर्णे, अमर झुगर, राजाराम शिंगे, आदिनाथ चिखलकर यांनी बांधली. दुपारपर्यंत अंबाबाई मंदिरात फारशी गर्दी नव्हती. मात्र, संध्याकाळी पाचनंतर दर्शनरांग गर्दीने फुलून गेली होती. (प्रतिनिधी)
पहिल्याच दिवशी पावणेदोन लाख भाविक
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनाला नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी पावणेदोन लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच ते रात्री आठ या वेळेत महाद्वारामधून ६ हजार २८२, घाटी दरवाजा येथे ५८ हजार ४४९, सरलष्कर भवन येथे २६१३७ पुरुष, ३० हजार ८२० महिला, विद्यापीठ दरवाजा येथून ४४ हजार ४४४३९ इतक्या भाविकांची नोंद झाली आहे.
अंबाबाईला सोन्याच्या मुलामाची प्रभावळ
श्री महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टच्यावतीने अंबाबाईच्या मूर्तीमागील प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ८ च्या दरम्यान ही प्रभावळ देवीला पुन्हा अर्पण करण्यात आली. आज, बुधवारी दुपारी बारा वाजता सोन्याचे मोर्चेल चवरी आणि अब्दागिरी देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
देवस्थानकडून प्रसाद वाटप
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे मंगळवारपासून देवीच्या भक्तांना शिरा प्रसाद वाटप सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी शंभर किलोंचा शिरा बनविण्यात आला.