रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकनास सुरुवात
By admin | Published: April 23, 2015 01:05 AM2015-04-23T01:05:08+5:302015-04-23T01:06:12+5:30
‘नोबेल’ : ३० दिवसांत काम संपविणार
कोल्हापूर : शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पावर नेमका किती खर्च झाला, याच्या पडताळणीचे काम बुधवारपासून सुरू झाले. पुण्यातील ‘नोबल इंटरेस्ट कन्सलटन्सी इंजिनिअर्स’ या कंपनीचे आठ अधिकारी व कर्मचारी दुपारी शहरात दाखल झाले. प्रमुख तेरा रस्त्यांपैकी तीन रस्त्यांची मोजमापे घेण्याच्या कामास सुरुवात झाली. येत्या ३० दिवसांत संपूर्ण प्रकल्पाचा सर्वेक्षण अहवाल देणे बंधनकारक असून त्यादृष्टीने नियोजन केल्याची माहिती ‘नोबेल’च्या प्रतिनिधीने ‘लोकमत’ला दिली.
प्रकल्पाअंतर्गत केलेल्या ५० किलोमीटर रस्त्यांची लांबी, रूंदी व काँक्रिटसह डांबरीकरणाची जाडी आदींची माहिती घेतली जाणार आहे. पदपथांची मापे, गटर्स व चॅनेल्सची जोडणी, पथदिवे आदींचे मोजमाप केले जाणार आहे. यासाठी प्रकल्पाचा करार, महापालिका व सोवेल कंपनीने केलेला पत्रव्यवहार, रस्ते महामंडळाने दिलेल्या सूचना आदींचा माहितीसाठी वापर केला जाणार आहे. ‘आयआरबी’ने केलेल्या कामांची २०१०-११ ‘डि.एस.आर.’ (जिल्हास्तरीय दरसूची)प्रमाणे मूल्य ठरविले जाणार आहे.
त्यादृष्टीने ‘नोबेल’ कंपनीने चार पथके तयार केली आहेत. आज शिये फाटा ते महावीर महाविद्यालय, शिवाजी पूल ते तावडे हॉटेल, शाहू नाका ते पोलीस अधीक्षक कार्यालय या तीन रस्त्यांचे मोजमाप घेण्याच्या कामास सुरुवात केली. ‘नोबेल’च्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका, आर्किटेक्ट असोसिएशचे पदाधिकारी व रस्ते विकास महामंडळाचे प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)