श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 11:48 AM2020-10-05T11:48:59+5:302020-10-05T11:52:27+5:30
महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा आदि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करावे अशी मागणी भाविक व नागरिक यांच्याकडून जोर धरू लागली आहे.
नृसिंहवाडी : महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा आदि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करावे अशी मागणी भाविक व नागरिक यांच्याकडून जोर धरू लागली आहे.
शासनाचे सर्व नियम पाळून किमान मुखदर्शनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी केली. या वेळी सचिव गोपाळ पुजारी, विकास पुजारी, प्रा.गुंडो पुजारी, श्रीकांत पुजारी उपस्थित होते.
पुजारी म्हणाले की, याबाबत भाविक व नागरिकांच्या मागणीचे लेखी निवेदन श्री दत्त देव संस्थान मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले आहे.
गेले 7 महीने देवस्थानची नित्यपूजा अर्चा चालू असून दसरा महोत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा मनोदय आहे. मंदिरे बंद असल्याने सर्वांनाच क्लोज सर्किट टीव्ही वर दर्शन घेण्याचा प्रसंग देवस्थानच्या इतिहासात प्रथमच निर्माण झाला आहे.
दरम्यान, अनलॉकमुळे तसेच भाविकांची श्रद्धा असलेने ठीक-ठिकाणाहून भाविक नृसिंहवाडी तीर्थक्षेत्री येण्यास प्रारंभ झाला असून प्रत्यक्ष दर्शन व पुजा-अर्चा करता येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. येथील मंदीरासभोवती सुसज्ज घाट असल्याने सोशल डिंस्टन्स ठेऊन भाविकांना सुलभ प्रकारे दर्शन घेता येऊ शकते असे मत यावेळी विश्वस्त यांनी व्यक्त केले.
पेढे-बासुंदीची लगबग सुरू
या क्षेत्रा वरील पेढे, बासुंदी व मिठाई प्रसिद्ध असून ती खरेदी करण्यासाठी भाविक येत असल्यामुळे मिठाई दुकानदारांची लगबग वाढली आहे.