जोतिबाच्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ
By admin | Published: October 14, 2015 12:20 AM2015-10-14T00:20:21+5:302015-10-14T00:20:48+5:30
नागवेली पानातील पूजा : भाविकांची पहिल्या दिवसापासून गर्दी
जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नवरात्रौत्सवाला मंगळवारी मोठ्या धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेला श्री जोतिबाची नागवेली पानातील आकर्षक महापूजा बांधण्यात आली. तसेच धुपारती सोहळ्याने घटस्थापनेचा धार्मिक विधी करण्यात आला.श्री जोतिबाच्या नवरात्रौत्सवाचा प्रारंभ पहाटे तीन वाजता महाघंटेच्या नादाने झाला. पहाटे चार वाजता श्री जोतिबा मूर्तीचे मुखमार्जन करून पाद्यपूजा करण्यात आली. पहाटे पाच वाजता महाभिषेक सोहळा संपन्न झाला. मंगळवारी नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेला नागवेली पानातील आकर्षक अलंकारित महापूजा बांधण्यात आली. ही पूजा आदिनाथ लादे, अंकुश दादर्णे, प्रकाश सांगळे, बाळासोा दादर्णे, अशोक दादर्णे, तुषार झुगर, गणेश बुणे, प्रवीण कापरे यांनी बांधली.
सकाळी नऊ वाजता श्री जोतिबा मंदिरात मंत्रोपचाराच्या स्वरात घट बसविण्यात आले. साडेनऊ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, महालदार, चोपदार, देवसेवकांच्या लवाजम्यासह श्री यमाई मंदिराकडे धुपारती सोहळा निघाला. श्री यमाई मंदिर, श्री तुकाई मंदिरात घट बसविण्याचा विधी झाला. सुवासिनींनी पाणी घालून धुपारतीचे दर्शन घेतले. यावेळी सुगंधी दूध वाटप करण्यात आले. कर्पुरेश्वर तीर्थावर दिवे सोडण्यात आले. धुपारतीसमवेत श्रींचे पुजारी देवसेवक, देवस्थान समितीचे प्रभारी लक्ष्मण डबाणे, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी आर. टी. कदम, सरपंच डॉ. रिया सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, ग्रामपंचायत सदस्य अजित भिवदर्णे उपस्थित होते. दुपारी एक वाजता तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप करण्यात आला. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. दरम्यान, जोतिबा दर्शनासाठी भाविकांची मंगळवारपासून गर्दी सुरू झाली. तेल घालण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक भागातील लाखो भाविक जोतिबा डोंगरला भेट देतात. (वार्ताहर)
उपवासधारक : संख्या वाढली
जोतिबाच्या नवरात्र उपवासाची मंगळवारपासून सुरुवात झाली. यंदाचे संपूर्ण नऊ दिवसांचे नवरात्र उपवास असल्याने नवीन उपवासधारकांची संख्या वाढली आहे. दोनवेळा फराळ, अनवाणी, उपरणे-धोतराचा पेहराव, प्रवास कमी, असे जोतिबा नवरात्र उपवासाचे स्वरूप असते.
खडकलाटची पाने
मंगळवारच्या महापूजेसाठी खडकलाट (ता. चिकोडी) येथील एका भाविकाने पाच हजार नागवेलीची (खाऊची) पाने आणली होती.