तीनशे वर्षांपूर्वीचा वाडा उतरण्यास प्रारंभ
By admin | Published: August 7, 2016 12:49 AM2016-08-07T00:49:02+5:302016-08-07T00:58:55+5:30
धोकादायक भाग उतरणार : १९ इमारती पाडणार; महापालिकेची पोलिस बंदोबस्तात कारवाई
कोल्हापूर : गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दोन घरांच्या भिंती कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मालक आणि कूळ वादातून न्यायप्रक्रियेत अडकलेल्या धोकादायक स्थितीतील १९ इमारती उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यापैकी महाद्वार रोड चौकातील गोसावी वाड्याची भव्य तीन मजली इमारत उतरण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे, मालकांचा विरोध न जुमानता पोलिस बंदोबस्तात या इमारतीचा धोकादायक भाग उतरण्यात येत आहे.
सुमारे १९ इमारती या कूळ आणि मालक वादामुळे गेली अनेक वर्षे न्यायप्रक्रियेत अडकल्या आहेत. त्यामुळे त्या इमारती अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत, पण या इमारतीला धोका पोहोचल्यास त्यासाठी पुढील जबाबदारी महापालिकेवर येते तसेच त्यामध्ये दुर्घटना घडल्यास नाहक बळी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा इमारतींबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अशा इमारतींचा धोकादायक भाग उतरण्याबाबत सूचना केल्या. त्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोडवरील महाद्वार चौकापासून अंबाबाई मंदिरपर्यंत असणाऱ्या प्रसिद्ध गोसावी वाड्याचे तिसऱ्या मजल्यावरील धोकादायक बांधकाम उतरण्यास प्रारंभ केला.
अंबाबाई मंदिरानजीक महाद्वार रोड चौकात गोसावी वाडा सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा असून तो अरुण राघवगिरी गोसावी वगैरे ६ जणांच्या नावावर आहे, तर या प्रसिद्ध वाड्यात १३ कुळे पूर्वीपासून आहेत. या इमारतीबाबत मालक आणि कूळ असा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. ही धोकादायक इमारत उतरण्यासाठी महापालिकेचे पथक आल्यानंतर मालकांनी त्यास विरोध करून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठीच्या जिन्याला कुलूप लावून अडथळा आणला. अखेर दुपारनंतर पोलिस यंत्रणा आल्यावर मालकांनी कुलूप काढले व बंदोबस्तात इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यास प्रारंभ केला.
ही कारवाई करताना काही वेळ महाद्वार रोड, तर पूर्ण दिवस अंबाबाई मंदिराचे महाद्वार प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद ठेवले होते.