महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ
By admin | Published: January 31, 2015 12:18 AM2015-01-31T00:18:07+5:302015-01-31T00:25:25+5:30
बाहुबलीत हजारो भाविक : शांतीचा संदेश देणारा सोहळा : राजू शेट्टी
बाहुबली : भगवान बाहुबलींनी ‘अहिंसा, सत्य आणि जगा व जगू द्या’ चा उपदेश केला होता. तोच उपदेश ज्ञानदानाच्या माध्यमातून बाहुबली विद्यापीठ व आश्रम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हा महामस्तकाभिषेक सोहळा आहे. या महामहोत्सवाच्या माध्यमातून जगाला शांतीचा संदेश देण्याचा सोहळा आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
खा. शेट्टी भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी सनतकुमार आरवाडे अध्यक्षस्थानी होते. पू. १०८ वर्धमानसागर महाराज, क्षुल्लक समर्पणसागर महाराज, नयपद्मसागरजी मुनी उपस्थित होते.
कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, महामहोत्सव सोहळा म्हणजे जैन व जैनेतर बांधवांना पुण्य प्राप्त करण्याचा प्रसंग आहे. दिगंबर व श्वेतांबर जैन बांधवांनी एकत्रितपणे येऊन कार्य करण्याची वेळ आहे. जैन समाजातील गरीब पण गरजू लोकांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. बाहुबली क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने विकासकामांना गती मिळाली. देशपातळीवर अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी आहे. नयपद्मसागर महाराजांनीदेखील दिगंबर-श्वेतांबर लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
समंतभद्र महाराजांनी आचार्यश्री शांतिसागर महाराजांच्या प्रेरणेने भगवान बाहुबलीची मूर्ती स्थापन केली आणि बाहुबलीशी आजूबाजूची ११७ गावे जोडली.
महोत्सवादरम्यान लाखो भाविकांची उपस्थिती राहणार असून सर्वांनी आनंदाने या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष डी. सी. पाटील यांनी केले.
क्षुल्लक समर्पणसागर महाराज, बी. टी. बेडगे यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी, आश्रममळा मंदिर, नेज येथे शांतिनाथ विधान झाले. ऐरावत हत्तीचे उद्घाटन आनंदभाई शहा यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी महावीर गाठ, विठ्ठल मोरे, सावकार मादनाईक यांचा
सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, बाबासाहेब पाटील, धनराज बाकलीवाल, डी. ए. पाटील, सुधाकर मणेरे, बबन
पाटील, प्रकाश पाटील, भरत ओसवाल, अनिल मकोटे, अंबालालजी जैन, कलगोंड पाटील, तात्यासोा अथणे, गोमटेश बेडगे, रमेश देसाई आदी उपस्थित होते.