मराठी भाषा फौंडेशन वर्ग नियमित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:12+5:302021-08-23T04:26:12+5:30
बुबनाळ : मराठी भाषा फौंडेशन वर्ग नियमित सुरू करावेत, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर मानसेवी शिक्षक संघटनेकडून निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब ...
बुबनाळ : मराठी भाषा फौंडेशन वर्ग नियमित सुरू करावेत, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर मानसेवी शिक्षक संघटनेकडून निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.
अल्पसंख्याक विभागाकडून निरंतर शिक्षण विभाग यांचेकडून उर्दू माध्यमाचा आठवी ते दहावी विद्यार्थ्यांचे मराठी भाषेचे ज्ञान वाढावे व स्पर्धा परीक्षेत यश मिळावे याकरिता मराठी भाषा फौंडेशन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे मुलांचे मराठी वाचन, लेखन यामध्ये गोडी निर्माण झाली. याकरिता उच्चशिक्षित शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या शिक्षकांना १ जुलै ते ३१ मार्च या शैक्षणिक वर्षात नऊ महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर नेमणूक केली जाते. या शिक्षकांची नेमणूक दरवर्षी योजना पुढे सुरू ठेवण्याच्या आदेशावर अवलंबून असते. हा आदेश प्रतिवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये काढण्यात येतो. पण सन २०२०-२१ पासून कोरोना महामारीच्या संकटामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झालेच नाही.
याबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची भेट घेऊन निवेदनही देण्यात आले होते. अद्याप मराठी भाषा फौंडेशन वर्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठी भाषा फौंडेशन वर्ग नियमित सुरू करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी मानसेवी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - २२०८२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - कोल्हापूर येथे मानसेवी शिक्षक संघटनेच्यावतीने उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.