कुंभोजला राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करा-: सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:47 PM2019-11-22T13:47:06+5:302019-11-22T13:49:42+5:30
नोकरदार व पेन्शनधारक लोक जास्त आहेत. त्याशिवाय जैनधर्मियांचे तीर्थक्षेत्र समजले जाणारे बाहुबली क्षेत्र याच गावाच्या हद्दीत येते. कुंभोज हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मगाव म्हणूनही त्यास वेगळे महत्त्व आहे.
कुंभोज : हातकणंगले तालुक्यातील राजकीय, सामाजिक, कृषी व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या कुंभोजमध्ये वारंवार मागणी करून राष्ट्रीयीकृत बँकांची शाखा सुरू होत नसल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या गावांसह हिंगणगाव, दुर्गेवाडी, नेज-शिवपुरी आणि नरंदे ग्रामस्थांनी गावसभेचे ठराव करून ही शाखा सुरू करण्याची मागणी लीड बँकेकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे; परंतु तरीही बँकिंग व्यवस्थेने या मागणीची दखल घेतलेली नाही.
आता या गावांतील लोकांना राष्ट्रीयीकृत बँकेतील व्यवहार करण्यासाठी वडगावला किमान १६ किलोमीटर व हातकणंगलेला १२ किलोमीटर जावे लागते. केंद्र व राज्य शासनांच्या अनेक योजना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीही राष्ट्रीयीकृत बँकेची गरज लागते. शेती पीककर्जासाठीही तिची गरज आहे. या बँकेच्या विविध कर्जयोजनाही माध्यमातून उपलब्ध असतात. सध्या गावात जिल्हा बँकेची शाखा आहे. त्याशिवाय आयसीआयसीआय बँक, तीन सहकारी बँका व १० पतसंस्था आहेत. चार सेवासंस्था आहेत. बँकिंग गरजा भागत असल्या तरी सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी. त्यासाठी जागेपासून हवी ती मदत देण्यास आम्ही तयार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात उत्तम शेती करणारी काही मोजकी गावे आहेत. त्यामध्ये या गावाची दखल आवर्जून घ्यावी लागते. सुमारे ३० हजार लोकवस्तीच्या गावांत वर्षाकाठी सुमारे दोन लाख टन ऊस पिकतो. पंचगंगा, शरद नरंदे, राजाराम कसबा बावडा, दत्त शिरोळ,जवाहर, शाहू कागल या कारखान्यांना या गावाचा ऊस जातो. ५०० हून अधिक एकरांत केळीचे पीक घेतले जाते. भाजीपाल्याचा व्यापार मोठा आहे. पतसंस्थांतील ठेवीच दहा कोटींहून जास्त आहेत. त्यावरून गावाची उलाढाल लक्षात येऊ शकेल. नोकरदार व पेन्शनधारक लोक जास्त आहेत. त्याशिवाय जैनधर्मियांचे तीर्थक्षेत्र समजले जाणारे बाहुबली क्षेत्र याच गावाच्या हद्दीत येते. कुंभोज हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मगाव म्हणूनही त्यास वेगळे महत्त्व आहे.
कुंभोजला राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू व्हावी यासाठी आम्ही गेली अनेक दिवस प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आजूबाजूच्या गावांचे ठरावही करून दिले आहेत. गावाची ती गरज असल्याने लीड बँकेने त्यासाठी सहकार्य करावे.
सरिता परीट, सरपंच, कुंभोज
कुंभोज हे अत्यंत सधन गाव आहे. सध्या गावात सहकारी बँकांसह पतसंस्थांचेही जाळे असले तरी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू होण्याची गरज आहे.
महाबली बड्डे, सामाजिक कार्यकर्ते
नव्याने विचार करू...
कुंभोजला सध्या आयसीआयसीआय बँकेची शाखा असल्याने ग्रामस्थांच्या बँकिंग गरजा भागतात असे समजून अन्य राष्ट्रीयीकृत बँका तिथे शाखा सुरू करण्यास तयार होत नाहीत. या बँकेनेच ग्रामस्थांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ द्यायला हवा. तरीही ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून नव्याने येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्यासाठी नक्की प्रयत्न केले जातील, असे लीड बँकेच्या सूत्रांनी सांगितले.