विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये नवे विभाग, संयुक्त अभ्यासक्रम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:30+5:302021-04-23T04:26:30+5:30
कोल्हापूर : अध्यायन, अध्यापन व मूल्यमापन, अभ्यासक्रम, संशोधन आणि विस्तार, आदींचे कौतुक, प्रशंसा करीत राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेने ...
कोल्हापूर : अध्यायन, अध्यापन व मूल्यमापन, अभ्यासक्रम, संशोधन आणि विस्तार, आदींचे कौतुक, प्रशंसा करीत राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेने (नॅॅक) शिवाजी विद्यापीठाला ‘ए-प्लस प्लस’ असे राज्यातील सर्वोच्च मानांकन दिले. मात्र, त्यासह बदलत्या तंत्रज्ञानाचा वेध घेऊन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत नव्या अभ्यासक्रमांचे विभाग सुरू करावेत. परदेशातील विद्यापीठांसमवेत करार करून त्यांच्या सहकार्याने संयुक्त अभ्यासक्रम राबवावेत, अशा विविध सूचना करीत विद्यापीठाला पुढील वाटचालीचा मार्ग दाखवून दिला आहे.
नॅक मूल्यांकन समितीने दि. १५ ते १७ मार्चदरम्यान विद्यापीठाला भेट दिली. या चौथ्या पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेच्या समारोपाप्रसंगी झालेल्या ‘एक्झिट मीटिंग’वेळी या समितीने त्यांचा अहवाल विद्यापीठाला दिला होता. विद्यापीठाने गुरुवारी हा अहवाल जाहीर केला. त्यामध्ये विविध सात सूचना केल्या आहेत. त्यात नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत आंतरविद्याशाखीय केंद्रे सुरू करावीत. विद्यापीठाने त्यांच्या कार्यक्षेत्रात ग्रामदत्तक योजना राबवून ग्रामविकासाला पाठबळ द्यावे. सामाजिक आणि मानव्यशास्त्र विषयांमधील संशोधन प्रकल्पांचे प्रमाण वाढवावे. विद्यापीठातील ॲॅड-ऑन अभ्यासक्रमाच्या प्रवेशजागा शंभर टक्के भरण्याबाबतची कार्यवाही करावी. शासनाने विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरण्यास परवानगी द्यावी यांचा समावेश आहे.
‘नॅक’ने केलेली प्रशंसा
अभ्यासक्रम : कार्यक्षेत्रातील गरजा ओळखून अभ्यासक्रमांची रचना. अभ्यासमंडळांवर औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधित्व. आऊट कम बेसड् एज्युकेशन
अध्यापन, मूल्यमापन पद्धती : विद्यार्थीस्तर लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अध्यापन पद्धतीचा विकास. विविध परीक्षांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी.
संशोधन आणि विस्तार : संशोधनाला बळ देणाऱ्या सुविधा. देशपातळीवर ठसा उमटविणारे विविध पाच विभाग. शिक्षकांना मिळालेली फेलोशिप, पेटंट.
विद्यार्थ्यांना पाठबळ : ४६ टक्के विद्यार्थ्यांना शासकीय, तर १४ टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती. कमवा व शिका योजना. प्लेसमेंट सेल, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षाची कामगिरी.
प्रशासन : बृहत आराखड्यानुसार वाटचाल. विविध अधिकार मंडळांचे योग्य पद्धतीने काम. राखीव निधीची तरतूद.
विविध उपक्रम : विद्यार्थी सुरक्षा, जलसंवर्धन, हरित परिसर, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, एनएसएसचे उपक्रम.
पायाभूत सुविधा : इमारती, सभागृह, अंतर्गत रस्ते उत्तम. अद्ययावत डाटा सेंटर, संपन्न ग्रंथालय, माहिती तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग.
प्रतिक्रिया
नॅक समितीने प्रशंसा केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या क्षमता अधिक विकसित केल्या जातील. केलेल्या सूचना विचारात घेऊन, कृती आराखडा तयार करून वाटचाल करण्यात येईल.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू.
चौकट
‘आयक्यूएससी’मुळे गुणवत्तेत आगेकूच
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची (आयक्यूएससी) कामगिरी रोल मॉडेल ठरणारी आहे. या कामगिरीमुळे विद्यापीठाने गुणवत्तेच्या मापदंडामध्ये आगेकूच केली असल्याचे या समितीने नोंदविले आहे.