कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अखेर सुरु, दिवस अन् विमानसेवेची वेळ काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:43 PM2022-10-04T18:43:34+5:302022-10-04T18:44:05+5:30
येत्या मार्चपर्यंत नवीन अद्यावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी दिले.
कोल्हापूर : स्वर्गीय राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीने तत्कालीन काळात कोल्हापूरविमानतळाची निर्मिती झाली. या विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता आपण कटीबध्द असून येत्या मार्चपर्यंत नवीन अद्यावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी दिले.
केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत स्टार एअरच्यावतीने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा प्रारंभ सिंधिया यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे फ्लॅग ऑफ दाखवून आजपासून करण्यात आला. ही विमानसेवा आठवड्यातील तीन दिवस मंगळवार, गुरुवार, आणि शनिवार या दिवशी असणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री सिंधिया म्हणाले, या विमातळामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन, कृषी तसेच इतर बाबींना चालना मिळून कोल्हापुरचा विकास होण्यास मदत होईल. या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे व्हावीत यासाठी आपले मंत्रालय कार्य करेल, तर कोल्हापूर येथील हे विमानतळ देशातील एक महत्वाचे विमानतळ म्हणून नावारुपाला येईल असा आशावाद राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केला.
छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या विमान सेवेत सातत्य रहावे. त्याचबरोबर मोठ्या अपेक्षेने सुरु झालेली ही विमानसेवा टिकविण्याची जबाबदारी कोल्हापूरवासियांची आहे. या विमानतळावरुन केवळ कोल्हापूर-मुंबई परत कोल्हापूर अशी सेवा सुरु न राहता आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर या विमानतळाच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी शासनाकडून जे जे शक्य आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी खासदार धनंजय महाडीक, संजय मंडलिक, धैर्यशील माने तसेच आमदार हसन मुश्रीफ यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
स्टार एअरचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी प्रास्ताविकात स्टार एअरची कनेक्टीव्हीटी देशातील प्रमुख 19 शहरांशी असल्याचे सांगितले. भविष्यात कोल्हापूर विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरु करण्याला स्टार एअर प्राधान्य देणार असल्याचे सांगून कोल्हापूरच्या विकासाकरिता स्टार उद्योग समूह सर्वोतोपरी योगदान देणार असल्याची ग्वाही दिली.
या समारंभासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अपर सचिव उषा पहाडी, स्टार एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरनसिंग तिवाना आदी दूरदृष्यप्रणालीव्दारे तर छत्रपती शाहू महाराज, राज्यसभा खासदार धनंजय महाडीक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे सर्वेसर्वा डॉ. संजय पाटील, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, स्टार एअरचे चेअरमन संजय घोडावत, संचालक श्रेणिक घोडावत आदी उपस्थित होते.
विमानसेवेची वेळ अशी
मुंबईतून निघणार - सकाळी १० : ३०
कोल्हापुरात येणार- सकाळी ११ : २५
कोल्हापुरातून निघणार-सकाळी ११ : ५०
मुंबईमध्ये पोहोचणार- दुपारी १२ : ४५
कोणत्या दिवशी : मंगळवार, गुरुवार, शनिवार
प्रवासी क्षमता : ५०