शहरातील देखाव्यांना प्रारंभ

By admin | Published: September 22, 2015 12:17 AM2015-09-22T00:17:37+5:302015-09-22T00:33:27+5:30

तुरळक गर्दी : मंडळांच्या कार्यकर्त्यांची तयारीची धावपळ, बहुतांश मंडळांचे बुधवारपर्यंत देखावे सुरू

Start the scenes in the city | शहरातील देखाव्यांना प्रारंभ

शहरातील देखाव्यांना प्रारंभ

Next

कोल्हापूर : घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सोमवारी शहरात काही मंडळांच्या देखाव्यांचा प्रारंभ झाला; मात्र अधिकतर लोकांनी गणेश विसर्जनानंतर विश्रांती घेणे पसंत केल्याने देखावे पाहण्यासाठी शहरात तुरळक गर्दी दिसून आली. बहुतांश मंडळांनी बुधवारपर्यंत देखावे सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यादृष्टीने त्यांची तयारीची धावपळ सुरू आहे.
गणेश आगमनाच्या पहिल्या दिवशी खुला झालेला राजारामपुरीतील शिवाजी तरूण मंडळाने साकारलेला खंडेरायाचा महाल आणि शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळ ट्रस्टने साकारलेली जेजुरीच्या खंडोबा मंदिराची ८० फूट उंच असलेली प्रतिकृती पाहण्यासाठी सोमवारी लोक येत होते; मात्र त्यांची संख्या कमी होती. राजारामपुरी पाचव्या गल्लीतील जयशिवराय तरुण मंडळाचा ‘मेरा नाम जोकर’ आणि चौथ्या गल्लीतील दख्खनचा राजा जोतिबाची सासनकाठीचा तांत्रिक देखावा पाहण्यासाठी गर्दी दिसून आली. रंकाळावेस गोल सर्कलच्या ‘कोल्हापूरचा राजा’ या आकर्षक गणेशमूर्तींच्या दर्शनासाठी गर्दी होती. फिरंगाई तालीम मंडळाचे ‘ड्रीम टेंपल’ आणि धोत्री गल्लीतील श्रीकृष्ण तरुण मंडळाची महाभारतातील अर्जुन-कृष्ण, भीष्माचार्य रूपातील गणेशमूर्ती पाहण्यासाठी खुली झाली. डांगे गल्ली तरुण मंडळाचा ‘मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास’ आणि गवंडी गल्लीतील मराठा मावळा मित्र मंडळाच्या ‘वृद्धाश्रम गरज की हतबलता’ हा तांत्रिक देखावा पाहण्यासाठी गर्दी होती. शिपुगडे तालीम मंडळाच्या ‘अंधश्रद्धा एक सामाजिक शाप’ या तांत्रिक आणि सजीव प्रबोधनात्मक देखावा आणि हाय कमांडो फे्रंडस् सर्कलच्या ‘स्वच्छ भारत’ देखाव्याचा सायंकाळी प्रारंभ झाला. लक्ष्मीपुरीतील स्वयंभू गणेश मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळाच्या आकर्षक गणेशमूर्ती अनेकजण मोबाईलमध्ये टिपून घेत होते. येत्या चार-पाच दिवसांत गर्दी होईल, हे लक्षात घेऊन अनेक गणेशभक्तांनी शिवाजी चौकातील २१ फुटी महागणपती आणि दर्शन घेतले. येथील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मंडळाच्या २१ फुटी गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी गर्दी होती. काहीजण चारचाकी, तर युवक दुचाकीवरून एकत्रितपणे देखावे पाहण्यासाठी फेरफटका मारताना दिसले. मंगळवारपेठ, जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, आदी परिसरातील महिला, लहान मुले हे आपल्या पेठेतील, कॉलनी आणि परिसरातील मंडळांचे देखावे चालत जाऊन पाहत होते. अनंत चतुर्दशीला पाच दिवस बाकी असल्याने अनेकजण देखावे पाहण्यासाठी सोमवारी बाहेर पडले नव्हते. त्यामुळे शहरातील विविध भागात देखावे पाहण्यासाठी लोकांची तुरळक गर्दी दिसली. (प्रतिनिधी)

छत्रपती शिवरायांची
२५ फुटी प्रतिकृती; लाईट हाऊसचे आकर्षण
व्हीनस कॉर्नर मित्रमंडळाचा ‘लाईट हाऊस’ देखावा मंगळवारी खुला होणार आहे. कोष्टी गल्लीतील स्वस्तिक तरुण मंडळाने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २५ फुटी प्रतिकृतीचे सायंकाळी सात वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या अनावरण होणार आहे. मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब, खासबागतर्फे सायंकाळी पानसुपारीचा कार्यक्रम होईल. या मंडळाच्या ‘गणपती बाप्पा आले मामाच्या गावाला’ हा तांत्रिक देखावा बुधवारी (दि. २३) खुला होणार आहे.

Web Title: Start the scenes in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.