सरुड, बांबवडे परिसरात भात पेरणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:01+5:302021-05-27T04:25:01+5:30
वारणा व कडवी या दोन नद्यांच्या काठावर असलेल्या सरुड परिसरातील शेतकरी दरवर्षी २१ मे चा मुहूर्त ...
वारणा व कडवी या दोन नद्यांच्या काठावर असलेल्या सरुड परिसरातील शेतकरी दरवर्षी २१ मे चा मुहूर्त साधून कुरीच्या साहाय्याने भात पेरणीस सुरुवात करतात. परंतु, तौत्के वादळामुळे गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने या वर्षी पेरण्या लांबणीवर पडल्याच्या दिसून येत आहे. सध्या जे शेत वाफे पेरणीयोग्य झाले आहेत, त्यामध्ये पेरण्या सुरू आहेत. वाढत्या ऊस लागवडीमुळे या वर्षी सरुड परिसरात भात पिकाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
बांबवडे परिसरातील सोनवडे, साळशी, पिशवी, शित्तूर तर्फ मलकापूर, सावर्डे बुद्रुक, परखंदळे, सुपात्रे, आदी डोंगराळ भागातील शेतकरी टोकण पद्धतीने भात पेरणी करतात. या परिसरात इतर पिकांपेक्षा भात पिकाचे क्षेत्र जास्त आहे. भात पेरणीमुळे कृषी सेवा केंद्रामध्ये भात बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकरी वर्ग जादा उत्पादनाच्या दृष्टीने आपल्या जमिनीचा पोत पाहून भात बियाण्यांची निवड करत आहेत. सरूड, बांबवडेसह पिशवी परिसरात यापुढील चार ते पाच दिवस भात पेरणीची धांदल सुरू असणार आहे.
फोटो ओळी : सावर्डे बुद्रुक (ता. शाहूवाडी) येथील महिला टोकण पद्धतीने शेतामध्ये भात पेरणी करीत आहेत.